ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारती उभारून पालिकेसह ग्राहकांची फसवणुक करणाऱ्या ६५ भुमाफियांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले असून या कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील इतर महापालिका क्षेत्रातील भुमाफियांचे धाबे दणाणून बेकायदा बांधकामांना लगाम बसेल अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र ही शक्यता फोल ठरली असून जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात बिनधिक्तपणे बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सर्वाधिक बांधकामे दिवा, मुंब्रा भागात सुरु असल्याच्या तक्रारी असून या बांधकामांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
ठाणे महापालिकेची यंत्रणा तीन वर्षांपुर्वी करोनाचा संसर्ग रोखण्याच्या आणि रुग्ण उपचाराची व्यवस्था करण्याच्या कामात व्यस्त होती. त्याचाच फायदा घेऊन भुमाफियांनी बेकायदा इमारती उभारणीची कामे सुरु केली होती. या बांधकामांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच पालिकेचे तत्कालीन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी विशेष मोहिम हाती घेऊन बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरु केली होती. या कारवाईमुळे भुमाफियांचे धाबे दणाणले होते. तसेच बेकायदा बांधकामे उभारणीची कामे थांबल्याचे चित्र होते. परंतु ही कारवाई थंडावताच गेल्या काही महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे उभारणीचे पेव पुन्हा फुटल्याचे चित्र आहे. भाजपचे आमदार संजय केळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेकायदा बांधकामांच्या मुद्द्याकडे प्रशासनाचे नुकतेच लक्ष वेधले असले तरी प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरुच असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये भाजपची निदर्शने
ठाणे, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु आहेत. ठाणे शहर आणि घोडबंदर भागातील बेकायदा बांधकामांचे पुरावे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच प्रशासनाला दिले असून त्यावर कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी विधानसभेतही याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. दिवा आणि मुंब्रा भागात सर्वाधिक बांधकामे सुरु असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मुंब्य्रातील खान कंपाऊंड, आचार गल्ली, मुनीर कंपाऊड, शिबलीनगर तसेच दिवा येथील साबे रोड, दिवा आगासन रोड, मुंब्रा देवी काॅलनी तसेच इतर भागातही बेकायदा बांधकामे सुरु आहेत. चार ते आठ मजली इमारती उभारणीची कामे याठिकाणी सुरु आहेत. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
हेही वाचा… डोंबिवलीत रिक्षेत विसरलेले महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चालकाकडून परत
पायाभुत सुविधांवर ताण
ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जलवाहीन्या टाकण्याची कामे सुरु आहेत. वाहतूकीसाठी रस्ते आणि नागरिकांना चालण्यासाठी पदपथाची निर्मीती केली जात आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मलवाहिन्या आणि नाल्यांची बांधणी केली जात आहे. परंतु शहरात उभारण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामांमुळे या पायाभुत सुविधांवर ताण येण्याची शक्यता आहे. तसेच शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी आखण्यात आलेली क्लस्टर योजनेतही या बांधकामांचा अडसर ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा… कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जागेत बेकायदा गाळ्यांची उभारणी
मुंब्रा परिसरात सुमारे ४० अनाधिकृत बांधकामे उभी राहत असून त्यावर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याच संदर्भात ठाण्यातील एका दक्ष नागरीकाने महापालिका मुख्यालयासमोर अनाधिकृत बांधकामांची ठिकाणे आणि मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्ताचा फोटो असलेला फलक लावला होता. त्यात या सहाय्यक आयुक्तावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. या फलकाची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधीत सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांना याबाबत स्पष्टीकरण देण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यावर साळुंखे हे काय स्पष्टीकरण देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.