ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात झाडांच्या धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्या पडून जिवित तसेच वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने एप्रिल महिन्यापासूनच झाडांच्या फांद्या छाटणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्य्ंत ४५ टक्के म्हणजेच ६३६७ झाडांपैकी २७५३ झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली असून उर्वरित झाडांच्या फांद्याची छाटणीची कामे मे महिनाअखेर पुर्ण करणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडतात. तसेच झाडांच्या धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्याही पडतात. अशा घटनेत यापुर्वी शहरात काही नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तसेच वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांंद्यांची छाटणी केली जाते. यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ६३६७ झाडांपैकी २७५३ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. हे प्रमाण सरासरी ४५ टक्के एवढे आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होवून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे.
त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे ६३६७ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व प्रभाग समिती क्षेत्रात ही मोहिम सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत नौपाडा-कोपरी (३५ टक्के), उथळसर (४० टक्के), लोकमान्य नगर-सावरकर नगर (४२ टक्के), वागळे (३५ टक्के), माजिवडा-मानपाडा (६० टक्के), वर्तकनगर (४८टक्के), कळवा (४६ टक्के), मुंब्रा (६३ टक्के) आणि दिवा (२४ टक्के) इतकी कामे झाली आहेत. झाडांच्या धोकादायक फांद्या काढणे आणि अतिरिक्त पर्णभार कमी करण्याचे एकूण सरासरी प्रमाण ४५ टक्के एवढे आहे. उर्वरित काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही वृक्ष अधिकारी सोनावणे यांनी सांगितले.
उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा आणि झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित रहावी, यासाठी अत्यावश्यक असेल तेथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात आहे. तसेच, वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्याशीही या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे.
त्याचबरोबर, या फांद्या काढल्यामुळे निर्माण होणारा हरित कचरा संकलित करुन शास्त्रशुध्द पध्दतीने सेंद्रिय खत निर्मितीकरिता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठविण्यात येत आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. धोकादायक झाडांबाबत नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी १८००-२२२-१०८ आणि ८६५७८८७१०१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.