ठाणे : शहरातील स्थानक परिसरात एका बाजूला महापालिकेने ‘स्थानक परिसरात जाहिराती लावण्यास सक्त मनाई आहे’ असे सूचना फलक लावण्यात आले आहेत. स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता प्रशासनाकडून संदेश दिला जात आहे. मात्र, याच सूचना फलकाच्या समोरील बाजुस राजकीय पदाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघनकरत बेकायदा फलकबाजी केली असल्याचे दृश्य दिसून आले.
ठाणे शहराच्या पश्चिमेस सॅटीस पुलाखाली प्रवाशांकरिता रिक्षा थांबा आहे. तसेच सॅटिसवर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची वाहतुक होत असते. मागील काही महिन्यांपुर्वी सॅटिस पुलाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. या ठिकाणी मत्स्यजीवनाचे सुंदर असे चित्र रेखाटण्यात आले आहे. एका बाजुला स्थानक परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. मात्र एका बाजुस स्थानक परिसरात बेकायदा फलकबाजी करू नये असे अधोरेखित केले असतानाही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र राजकीय पेक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निवडून आलेल्या काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचा विजय साजरा करण्यासाठी शहरातील विविध परिसरात फलक लावत शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे भावी मंत्री या आशयाचे तर एका पदाधिकाऱ्याचे कार्यक्रमा संदर्भातील फलक लावण्यात आले आहेत. यात फलकांच्या समोरील बाजुस जाहिराती लावण्यास सक्त मनाई आहे असे सूचना फलक आहे. उल्लंघन केल्यास संबधितांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल स्पष्ट सांगण्यात आले आहे. मात्र एका बाजुस मनाई असताना समोरच बेकायदा फलक लावून सर्रास नियमांचे उल्लंघन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
ठाणे स्थानक परिसरात विविध जाहिराती करण्यात येत असतात. मात्र काही ठिकाणी जाहिराती लावण्यास पालिकेने मनाई केली आहे. याच ठिकाणी राजकीय पदाधिकारी फलकबाजी करून नियम धाब्यावर मांडत असल्याचे दिसून आले.
स्थानक परिसरात विनापरवाना फलक लावण्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत फलक काढुण टाकण्याची कारवाई केली जाईल. सोपान भाईक, सहाय्यक आयुक्त, नौपाडा