ठाणे : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दावोसला उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते. पण, त्यावेळेस आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असतानाही दावोसला गेले होते. या काळात उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया होणार होती. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे दावोस दौऱ्यावर निघून गेले होते आणि दौरा संपल्यानंतरही ते काही दिवस तेथून परतलेच नव्हते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी ठाण्यात केला. तसेच दावोसाला ते कुणाबरोबर बर्फात खेळत होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे हे त्यांच्यावर टीका करीत आहेत. त्याला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दावोस येथे उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते. पण, त्यावेळेस आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असतानाही दावोसला गेले होते. लहान मुले खाऊसाठी हट्ट करतात, तसा हट्ट करून ते दावोसला गेले होते. याचा त्यांना विसर पडला असून त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याची टीका म्हस्के यांनी केली.
हेही वाचा : कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे यांच्यावर कठिण शस्त्रक्रीया होणार होती. अशा काळात मुलाने त्यांच्या जवळ असणे अपेक्षित होते. पण, अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे दावोस दौऱ्यावर निघून गेले होते. विशेष म्हणजे दौरा संपल्यानंतरही ते काही दिवस तेथून परतलेच नव्हते. ज्यांचा उद्योगाशी संबंध नाही, अशा लोकांना घेऊन ते तिथे गेले होते. त्यामुळे ते तिथे कुणाबरोबर बर्फात खेळत होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
आव्हाडांना टोला
ठाण्यात शिवसेनेच्यावतीने श्रीराम मंदीर प्रतिकृती मिरवणुक आणि महाआरती कार्यक्रमाला सर्व आमदार आणि खासदारांना निमंत्रण दिले जाणार आहे. परंतु ज्यांनी प्रभू श्रीरामाबद्दल चुकीचे वक्तव्य केले, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार नाही. या कार्यक्रमांना बोलावून कार्यक्रमाची शोभा घालवणार नाही, असे सांगत नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला.
हेही वाचा : ट्रक टर्मिनल उभारणीसाठी वेगवान हालचाली; ठाणे शहराच्या वेशीवर उभारले जाणार ट्रक टर्मिनल
…तर स्वत: निमंत्रण देईल
आयोध्येमध्ये प्रभु श्रीरामाचे मंदीर होत आहे, हे मंदीर उभारणीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. हे खासदार राजन विचारे यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मान्य करावे. त्यांनी हे मान्य केले तर, स्वत: त्यांच्या घरी जाऊन कार्यक्रमाचे निमंत्रण देईन. त्यासाठी घराबाहेर अर्धा तास वाट पहावी लागली तरी त्याचीही माझी तयारी आहे, असे आव्हान नरेश म्हस्के यांनी विचारे यांना दिले.