ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात असून ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. या दाव्यामुळे ठाकरे गटातील आमदारांसह पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी भरत गोगावले हेच शिवसेना पक्ष प्रतोद असल्याचे स्पष्ट केले आहे. तर, उबाठा गटातील आमदारांना अपात्र करणे गरजेचे आहे. अध्यक्षांना कुणी भिती दाखविली का आणि त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का, यामुळेच त्यांनी हा निकाल दिला का, असे अनेक प्रश्न आम्हाला पडलेले आहेत. त्यामुळेच नियमानुसार आम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊन उबाठा गटातील १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : “आदित्य ठाकरे दावोसला बर्फात कुणाबरोबर खेळत होते”, नरेश म्हस्के यांचा सवाल
आपल्या बाजूने निकाल लागला तर, चांगले बोलायचे आणि विरोधात निकाल लागला तर टीका करायची, ही त्यांची सवय आहे. पक्षात उरलेले आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कायकर्ते सोडून जाऊ नयेत म्हणून काही तरी कारण हवे आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका केली जात आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि हे सर्वजण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच येत्या काळात सर्वजण त्यांना सोडून जातील, असा दावाही त्यांनी केला.