ठाणे : कळवा येथील मफतलाल कंपनी परिसरात बुधवारी इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. कुसुमदेवी विश्वनाथ गुप्ता (२८), लाल बादशाह (६६) आणि मेहबूबी लाल बादशहा (५६) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरींचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मफतलाल कंपनी परिसरात शांतीनगर लोकवस्ती आहे. या लोकवस्तीमध्ये विश्वनाथ गुप्ता वास्तव्यास असून त्यांचे वाहन दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी एका इलेक्ट्रीक दुचाकीची बॅटरी घराच्या पोटमाळ्यामध्ये ठेवली होती. मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास या बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, घराची भिंत कोसळली.
हेही वाचा…आमदार राजन साळवी यांच्या पुतण्याची एसीबीकडून पाच तास चौकशी
त्यामुळे विश्वनाथ यांची पत्नी कुसुमदेवी या घटनेत जखमी झाल्या. तसेच शेजारी राहणारे लाल बादशाह आणि मेहबूबी हे देखील जखमी झाले. घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधला. जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.