कल्याण: गेल्या महिन्यापासून शहापूर तालुक्यातील अनेक गाव हद्दीतील जीओ मोबाईलचे नेटवर्क गायब असल्याने या भागातील नोकरदार वर्ग सर्वाधिक हैराण झाला आहे. साठगाव, शेणवे, मळेगाव, मुसई, कुल्हे परिसरात हा प्रकार सर्वाधिक असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. जीओ मोबाईलवर काॅल आला तर तो अचानक बोलताना कट होतो. नेटवर्क येण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांना गावाबाहेर उंच टेकडीवर जावे लागते. तेथे चुकून नेटवर्क असेल तर मोबाईल लागतो. अन्यथा नेटवर्क कधी येईल या प्रतिक्षेत ग्रामस्थांना थांबावे लागते.
अलीकडे सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होतात. शेतकऱ्यांना बँँकेचे व्यवहार करताना मोबाईलचा वापर करावा लागतो. आता शेतीविषयक बी-बियाणे, शासन सुविधांचा लाभ ऑनलाईन माध्यमातून घेण्यासाठी मोबाईलचा वापर प्रभावीपणे केला जातो. बँकेतील बहुतांशी व्यवहार, ओटीपी, गॅस अनुदान, दुकानात ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहक, दुकानदार त्रस्त आहेत, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.
हेही वाचा : डम्पर अपघातामुळे डोंबिवलीतील कुटुंबीयांचे दुबईला जाण्याचे स्वप्न भंगले
ग्रामीण भागातील अनेक उच्चशिक्षित नोकरदार घरात बसून कार्यालयीन कामकाज करतात. त्यांची जीओ नेटवर्क नसल्याने सर्वाधिक कोंडी झाली आहे. आता गावागावामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. गावांमधील बहुतांशी व्यवहार मोबाईलवर अवलंबून असतात. लहान मोठे व्यवासायिक, त्यांना संपर्क करण्यासाठी मोबाईल महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातील बीएसएनएलचे नेटवर्क मागील सहा वर्षापूर्वी बंद पडत गेल्यानंतर गावांमध्ये जीओचा मोबाईल घेण्याची स्पर्धा लागली. सुरूवातीच्या काळात गावात जीओचे मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरातील शेणवे भागात जीओचे नेटवर्क नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक ग्रामस्थ, वित्तीय संस्थांनी यासंदर्भात जीओच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आहे. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
हेही वाचा : मेगा ब्लॉक संपल्यानंतरही प्रवाशांचे हाल कायम, रेल्वे गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने
महिनाभरापासून शहापूर तालुक्यातील शेणवे परिसरात जीओचे नेटवर्क नाही. दिवसातून चुकून एक ते दोन वेळा काहीक्षण नेटवर्क येते. बोलता बोलता मोबाईल कट होतो. याविषयी अनेक तक्रारी जीओच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही.
प्रताप शिर्के (मोबाईल वितरक, शहापूर-शेणवे)