ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीची दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी शहराच्या वेगवेग‌ळ्या भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्याचे पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना काहीसा जलदिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून १२० दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ ते शनिवार, २२ जून रोजी सकाळी ११ या वेळेत महापालिकेच्या योजनेतून होणारा २५० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा : कल्याण पूर्वेतील दावडी गावातील बेकायदा इमारतीवर हातोडा, भर पावसात भुईसपाट करण्याची कारवाई

या काळात स्टेम प्राधिकरणाकडून येणारा पाणीपुरवठा विभागवार सुरु ठेवण्यात येणार आहे. यानुसार शुक्रवार, २१ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या १२ तासांच्या अवधीत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईन येथील पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार, २१ जून रोजी रात्री ११ ते शनिवार, २२ जून रोजी सकाळी ११ या काळात ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंबा व कळव्याचा काही भाग येथे १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात, पिसे उदंचन केंद्र, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सब स्टेशनमधील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, फिल्टर बेड वॉल्व्ह दुरुस्ती आदी तातडीची कामे करण्यात येणार आहेत. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane no water supply on friday and saturday due to repairing works of pipeline css