ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागातील चौकांमध्ये वाहनांमुळे ध्वनी प्रदुषण होत असून त्याचबरोबर शांतता क्षेत्र असलेल्या कोर्टनाका परिसरात आवाजाची पातळी उच्च असल्याची बाब पालिकेच्या पर्यावरण अहवालातून पुढे आली आहे. तसेच शहरातील हवा प्रदुषण आणि तलावातील पाणी गुणवत्तेत मात्र सुधारणा झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील गृहसंकुलातील कुपनलिकांचे पाणी दुय्यम गरजांसाठी वापरले जाऊ शकते आणि पिण्यासाठी वापर करायचा असेल तर पाण्यावर प्रक्रीया करणे आवश्यक आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सहन न होणाऱ्या कर्कश आवाजाच्या अनेक स्त्रोतांमुळे शहरामध्ये ध्वनी प्रदुषण होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक, मोठ्या आवाजात संगीत, यंत्र, घरातील विद्युत उपकरणे, विमानांचा व रेल्वेचा आवाज, औद्योगिक आणि निवासी इमारतींमधून निर्माण होणारे आवाज याचा समावेश असतो. जल, वायु आणि इतर प्रदुषणाच्या तुलनेत ध्वनी प्रदुषणाचा प्रभाव कमी असला तरी त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि प्राण्यांवर होतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील चौकांमधील आवाजाची पातळी मोजली. यामध्ये शहरातील वेगवेगळ्या भागातील चौकांमध्ये विहित मानकांपेक्षा जास्त आवाजाची पातळी आढळून आली आहे. ध्वनी प्रदुषण हे प्रामुख्याने वाहतूक आणि गर्दीमुळे होते. तसेच कोर्टनाका परिसर शांतता क्षेत्र असून तिथेही आवाजाची पातळी उच्च आढळून आली आहे, असे निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आले आहेत. तसेच ध्वनी प्रदुषण आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. सर्व चौकांमध्ये ध्वनी पातळी मापन आणि फलक असावा. यामुळे लोकांना पातळीची जाणीव होईल आणि ध्वनी प्रदुषण कमी होण्यास मदत होईल, अशा उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : संवेदनशील भागातील तणावावरून कल्याणमध्ये दोन पोलीस निलंबित

हवा गुणवत्तेत सुधारणा

ठाणे महापालिका क्षेत्रात २०२२ मध्ये काही ठिकाणी हवा प्रदुषित होती. बाळकुम नाका, गावदेवी नाका आणि कापुरबावडी नाका येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० हून अधिक होता. परंतु २०२३ मध्ये या सर्वच भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या आत आला आहे. तसेच कोपरी वगळता शहराच्या इतर भागांमध्येही हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या आत असल्याचे आढळून आलेले आहे. एकूणच शहरातील हवा मध्यम प्रदुषित गटात मोडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा निष्कर्ष पालिका पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील निवासी क्षेत्रातील हवा मध्यम प्रदुषित तर, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील हवा समाधानकारक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : भाजपची आता राम यात्रा, महाराष्ट्रातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची तयारी

तलाव पाणी गुणवत्तेत सुधारणा

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात ३७ तलाव अस्तित्वात आहेत. या तलावांच्या संवर्धनासाठी महापालिकेकडून नियमितपणे विविध कामे केली जात आहेत. यामध्ये तलावातील गाळ काढणे, आजूबाजूच्या परिसर साफ करणे, एरिएशन यंत्रणा उभारणे, प्रोबायोटिक उपचार पद्धतीचा अवलंब करणे यामुळे शहरातील सर्वाधिक तलावांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारताना दिसून येत आहे, असा निष्कर्षही अहवालात काढण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane noise pollution at chowks due to horn of vehicles air and water pollution declined css
Show comments