उल्हासनगरः उल्हासनगरच्या ग्लोबल राईट्स फाऊंडेशन आणि एसएसटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पहचान २०२५ या कार्यक्रमात ट्रान्सजेंडर समुदायाला शासकीय ओळख प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शासकीय ओळख मिळाल्याने यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणअयासह शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. आत्मसन्मानाची ओळख मिळाल्याचा आनंद या ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून आला.

तृतीयपंथीयांसह ट्रान्सजेंडर समुहातील अनेकांना अधिकृत शासकीय ओळखपत्र नसल्याने विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. ओळखपत्रच नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. शिक्षण, योजना, शासकीय सहभाग अशा सर्वच पातळ्यांवर या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो. कागदोपत्री नोंदी उपलब्ध नसल्याने, शासकीय ओळखपत्रे तयार करण्यासाठी अडचणी येत असतात. त्यामुळे यातून ट्रान्सजेंडर व्यक्तींना दिलासा देण्यासाठी त्यांच्या ओळख प्रमाणपत्रांसाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर उल्हासनगरातील एसएसटी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या भव्य समारंभात ही ओळख प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.

ओळख प्रमाणपत्रे हाती घेताच अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले ज्यांनी. अनेक व्यक्तींनी ही ओळखपत्रे मिळवण्यासाठी अनेक वर्षे प्रतिक्षा केली होती. त्यामुळे त्यांना शासनमान्य अधिकृत ओळख मिळाल्याने हा भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला. या प्रमाणपत्रामुळे ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळू शकणार आहे. केवळ ओळखच नव्हे, तर त्यांनी पूर्ण केलेल्या कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्रांचेही वितरण यावेळी करण्यात आले. या व्यक्तींना स्वावलंबी बनण्यासाठी हे प्रमाणपत्र बळ देणार आहे.

यावेळी एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, सहाय्यक आयुक्त मयुरी कदम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी सचिन पालखे, ग्लोबल राईट्स फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. योगा नांबियार, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा मलबारी, ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेतृत्वकर्त्या गुरु माँ शिल्पा पाटील आणि गुरु माँ मुजरा, राष्ट्रीय सेवा योजनेचे ठाणे जिल्हा समन्वयक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे, उपप्राचार्य डॉ. दीपक गवादे यांच्यासह अनेक मान्यवर उपास्थित होते.

Story img Loader