ठाणे : मागील एक ते दीड महिन्यांपासून कोकण विभागात पदवीधर निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून तसेच जिल्हा निवडणूक विभागाकडून पदवीधरांच्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात शिबीरे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. असे असले तरी या नोंदणीकडे मतदारांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या वेळेस सुमारे ४६ ते ४७ हजारांच्या घरात मतदार नोंदणी झाली होती. यंदा आतापर्यंत केवळ सुमारे १७ हजार पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी जनजागृती सुरू केली आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत नव्याने यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले होते. विधानपरिषदेच्या पदवीधर आमदारकीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यामुळे यंदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात डेंग्यू – मलेरियाची साथ
ठाणे जिल्ह्यात मागील निवडणूकीत ४६ हजार पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणी केली होती. यंदा मतदार नोंदणीत वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. तसेच जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, मीरा – भाईंदर, भिवंडी, ठाणे ग्रामीण या संपूर्ण विभागातून केवळ १७ हजारांच्या घरात पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी नोंदणी झाल्याने जिल्हा निवडणूक विभागाला ही नोंदणी संख्या वाढविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा : औद्योगिक कचऱ्याच्या साठवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल
मागील निवडणुकीत कोकण विभागातून सुमारे १ लाखाहून अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली होती. यामध्ये सर्वाधिक अशी ४६ हजार नोंदणी ही ठाणे जिल्ह्यातून झाली होती. या निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत नाव नोंदणी करणे बंधनकारक असते. यंदा मात्र याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे जिल्ह्यातून केवळ १६ हजार ८४६ मतदारांनी ऑफलाईन अर्ज केले आहे. तर याची पहिली यादी येत्या काही दिवसात जाहीर केली जाणार आहे. तर नव्याने नाव नोंदणीसाठी ९ डिसेंबर ही अंतिम तारीख असणार आहे. तर ऑनलाईन साठी सुमारे ७ अर्ज आले आहेत मात्र याची छाननी प्रकिया अद्याप बाकी आहे.
हेही वाचा : कल्याण : कुलगुरू अशोक प्रधान मारहाण प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू
“पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी ९ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.” – अर्चना कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे