कल्याण : ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागात काही महिन्यांपासून पादचारी महिला, पुरूष यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामधील दोन जण फरार आहेत. या चोरट्यांनी अशाप्रकारचे २० गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. ते मुळचे गुजरातमधील आहेत.

कन्नुभाई सोळंकी, शरीफ खान अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या दोघांचे अन्य दोन साथीदार जिग्नेश घासी, जसवंत मीना हे फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. कल्याण पश्चिमेत पौर्णिमा सिनेमा चौकात एका पादचारी महिलेची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. महात्मा फुले पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार केली होती. ही चोरीची घटना पौर्णिमा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

हेही वाचा : ठाण्यात कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे, ठाणे महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहर परिसरातून गुन्हेगारांचा बिमोड करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक विकास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून यामधील गुन्हेगारांची ओळख पटविण्यात आली.

हेही वाचा : डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ

पोलीस तपासातून पुढे आलेली माहिती अशी की गुजरातमधील हिम्मतनगर येथील कन्नुभाई सोळंकी, जिग्नेश घासी हे बांधकाम मजूर आहेत. गुजरात येथे बांधकामावर सुट्टी घेऊन ते वसई येथील मित्र शरीफ खानकडे पाहुणे म्हणून येत होते. शरीफ खान हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. वसई येथे आले की सोळंकी आणि घासी हे ठाणे, पालघर भागात भटकंती करून पादचारी नागरिकांना हेरून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज लुटण्याचे काम करत होते. लुटलेला माल घेऊन ते वसई येथे जात होते. तेथे चोरीचे मंंगळसूत्र, सोनसाखळी ऐवज जसवंत मीना या व्यक्तिकडे विक्रीसाठी दिला जात होता. मीनाने ऐवज विकला की मिळालेली रक्कम ते समान हिश्याने वाटून घेत होते. महात्मा फुले पोलिसांनी सोळंकी, खानला कौशल्याने अटक केली आहे. त्यांनी ऐवज चोरीचे २० गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलीस मीना आणि घासी या दोघांचा शोध घेत आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या वर्षभरात सोनसाखळी, ऐवज चोरीचे गुन्हे याच टोळीने केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Story img Loader