ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी शहरात मिनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमा, नौपाडा भागात उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. या उड्डाणपुलालगत असलेल्या इमारतीतील रहिवाशांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून उड्डाणपुलाच्या कठड्यांवर ध्वनी रोधक बसविण्यात आले आहेत. या ध्वनी रोधकाचे भाग गेल्याकाही दिवसांपासून गायब होऊ लागले आहे. गर्दुल्ले आणि चोरटे या ध्वनी रोधकाच्या भागांची चोरी करत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झालेले नाही. शिल्लक असलेले ध्वनीरोधक अर्धवट काढण्यात आले असून ते खाली पडल्यास उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरातील अंतर्गत मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने मीनाताई ठाकरे चौक, वंदना सिनेमा आणि नौपाडा येथे उड्डाणपूलांची निर्मिती केली आहे. या सर्व उड्डाणपुलांलगत इमारती आहेत. वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना रात्री ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे वाहनांचा आवाज रोखण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलांच्या कठड्यावर ध्वनी रोधक बसविले आहेत. या ध्वनी रोधकांमुळे वाहनांचा आवाज रोखला जातो. गेल्याकाही दिवसांपासून या ध्वनी रोधकाचे भाग अचानक गायब होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत ‘एक्स’ तसेच इतर समाजमाध्यमांवर नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.
हेही वाचा : उल्हासनगरातील २७ हजार अनधिकृत बांधकामे नियमित ; केवळ १० टक्के दंड आकारणी; राज्य सरकारचा निर्णय
ध्वनी रोधकाचे भाग चोरटे आणि गर्दुल्ले ध्वनी रोधक चोरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. चोरट्यांनी काही ध्वनी रोधकाचे भाग अर्धवट काढून ठेवले आहे. हे ध्वनी रोधक उड्डाणपुलांवरून खाली पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते असे वाहन चालकांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत नौपाडा पोलिसांना विचारले असता, अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर ठाणे महापालिकेला संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळ शकली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून ध्वनी रोधक गायब होत आहे. महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटना घडू शकते.
रोहीत दिवेकर, वाहन चालक.