ठाणे : प्रवासी म्हणून टॅक्सीत बसणाऱ्या तिघांनी टॅक्सी चालकाला टॅक्सीतून खाली ढकलत टॅक्सी घेऊन निघून गेल्याची घटना खारेगाव टोलनाक्याजवळ घडली. या घटनेत टॅक्सी चालकाला मारहाण करुन त्याचा मोबाईल आणि एक हजार ३०० रुपये देखील चोरट्यांनी चोरले. याप्रकरणी टॅक्सी चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई येथील चेंबूर भागात टॅक्सी चालक राहतो. तो एका व्यक्तीच्या मालकीची टॅक्सी भाडेतत्तावर चालवितो. सुमारे महिन्याभरापूर्वी मध्यरारात्री तो चेंबूर भागात टॅक्सी चालवित होता. तेव्हा एक व्यक्ती त्याच्याजवळ आला. त्याने ठाण्याला जाऊन पुन्हा चेंबूरला यायचे असल्याचे सांगितले. टॅक्सी चालकाने होकार दिल्यानंतर तो प्रवासी टॅक्सीत बसला. टॅक्सी काही अंतरावर गेल्यानंतर त्या प्रवाशाचे आणखी दोन मित्र त्या टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी खारेगाव टोलनाक्यावर आल्यानंतर एका प्रवाशाने त्याला टॅक्सी थांबविण्यास सांगितली.
टॅक्सी चालकाने टॅक्सी थांबवली. एक प्रवासी टॅक्सीतून बाहेर पडला आणि पुन्हा टॅक्सीत बसण्यास आला. त्याचवेळी मागील आसनावर बसलेल्या दोन प्रवाशांनी टॅक्सी चालकाचा गळा पकडून त्याला मागील आसनावर खेचले. त्यानंतर त्याला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल आणि खिशातील एक हजार ३०० रुपये काढून घेतले. तसेच टॅक्सी चालकाला टॅक्सीबाहेर फेकून टॅक्सी घेऊन ते निघून गेले. या प्रकरणी मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ३० मार्चला कळवा पोलीस ठाण्यात वर्ग झाले आहे.