ठाणे: एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या संपाचा परिणाम प्रवाशांना मोठ्याप्रमाणात बसला. प्रवाशांना आर्थिक भूर्दंडासह त्यांचा अधिक वेळही खर्चिक झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी चार ते सहा महिन्यांआधीपासून एसटी गाड्यांची आगाऊ आरक्षण केले होते. ते प्रवासी गाडीच्या नियोजित वेळेत मंगळवारी सकाळी एसटी आगारावर आले, परंतू संपामुळे अचानक एसटी गाड्या रद्द करण्यात आल्याचे त्यांना समजताच, त्यांचा गोंधळ उडाल्याचे चित्र होते. विरार येथे राहणारे चित्रसेन शिरसाट हे पहाटे ५.४५ ला ठाण्यातील खोपट आगारात पारनेरला जाणारी एसटी पकडण्यासाठी आले होते. त्यांची एसटी ६ वाजता आगारात येईल, असे त्यांना आगारातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ते एसटीचे वाट पाहत उभे होते. परंतू, अचानक ६.३० ला त्यांना समजले की, पारनेरला जाणारी एसटी रद्द करण्यात आली आहे. आता गावाला कसे पोहोचायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यांच्या आणखी बरेच प्रवासी तिथे ताटकळत उभे होते. एक ते दीड तासानंतर ७.३० वाजता आगारातून माळशेज मार्गे आळेफाटापर्यंत एसटी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी चित्रसेन यांनी आळेफाटापर्यंत एसटीने प्रवास करण्याचे ठरविले. आळेफाट्याला उतरुन ते पुढील प्रवास खासगी वाहनाने करण्याचे नियोजन केले. परंतू, या सगळ्या गोंधळात अधिकचे पैसे आणि वेळ खर्चीक झाल्याचे चित्रसेन यांनी सांगितले. कारण, एसटीने प्रवास केल्यास प्रत्येक व्यक्तीमागे २६० रुपय पर्यंत खर्च येतो. परंतू, आळेफाट्यानंतर खासगी वाहनाने प्रवास केल्यामुळे मला दोन हजार ते अडीच हजार इतका खर्च आला. तर, ठाणेहून एसटीने नगरला पोहोचण्यास सहा ते सात तासांचा अवधी लागतो. परंतू, आज या संपामुळे दहा तासांहून अधिक वेळ प्रवास खर्चिक झाल्याचे चित्रसेन यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी

तर, खोपट आगारातून मंगळवारी पहाटे ५ ते ५.१५ वाजताच्या दरम्यान, ठाणे ते चिपळून एसटी गाडी होती. या गाडीसाठी अनेक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले होते. या गाडीसाठी प्रवासी पहाटे चार वाजल्यापासून आगारात येऊन थांबले होते. परंतू, ५.३० वाजताच्या दरम्यान या प्रवाशांना सांगण्यात आले की, गाडी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले. गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे गावाला लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आहे. त्यानुसार, आजच्या दिवसाच्या गाडीची आगाऊ आरक्षण आम्ही केले होते. परंतू, अचानक गाडी रद्द करण्यात आली. त्यात, तिकीटाचे पैसेही वाया गेले. आता, गावाला कसे पोहोचायचे अशी अडचण प्रवाशांपुढे निर्माण झाली. तिकीटाचे पैसे गणेशोत्सवा नंतर दिले जातील असे आगारातून जरी सांगण्यात आले, तरी आता आम्ही ऐन वेळेस कोणत्या गाडीने प्रवास करायचा आणि त्यासाठी पैसे कुठून आणायचे, अशी खंत एका प्रवाशाने व्यक्त केली. तर, याच गाडीने काही ज्येष्ठ नागरिक देखील कोकणात जाणारे होते. ठाण्यातील शिवाईनगर भागातील एक ज्येष्ठ दांप्तत्य सकाळी ४.३० वाजल्यापासून खोपट आगारात येऊन थांबले होते. परंतू, गाडी येणार नाही असे ५.३० वाजता कळताच, त्यांनी त्यांच्या मुलाला आगारात बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्या मुलांनी खासगी वाहन करुन त्यांना गावी पाठवले.