ठाणे – अयोध्येचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या सोमवारी पार पडणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात राम मंदिर सोहळ्यानिमित्त नवनवीन वस्तू दाखल झाल्या आहेत. अशातच शहरातील नामांकित मिठाईच्या दुकानांमध्ये राम नाम असणारे केसर पेढे दाखल झाले आहेत. प्रसाद म्हणून हे पेढे खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
अयोध्येत येत्या सोमवारी, २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात रामनामाचा जागर आणि राम उत्सव सुरू आहे. या सोहळ्याच्या निमित्त शहरातील बाजारपेठांना नवा साज चढल्याचे दिसून येत आहे. अनेक संस्था, गृहसंकुलांमध्ये राम उत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यासाठी लगबग सुरू आहे. रामाचे टी-शर्ट, साड्या, कंदील, झेंडे, पताका अशा विविध वस्तूंनी बाजारास नवा रंग चढला आहे. अशातच शहरातील नामांकित मिठाई दुकानात ‘जय श्रीराम’ या नावाचा छापा असणारे केसर पेढे दाखल झाले आहेत. ४५० ते ४६० रुपयांना २० पेढ्यांचा बाॅक्स असल्याची माहिती मिठाई विक्रेत्यांनी दिली. या पेढ्यांबरोबरच बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडू, काजूकतलीदेखील नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. ‘जय श्रीराम’ नामाचा छापा असणारा एक पेढा साधारण २३ रुपयांना विकला जात आहे. बुंदीच्या एका लाडूची किंमत २९ रुपये आहे तर, मोतीचूरचा एक लाडू ३१ रुपयांना आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये राम उत्सावानिमित्त विशेष सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत.
राम उत्सवानिमित्त मिठाईची दुकाने सजली आहेत. केशर पेढा, जिलेबी, मालपुवा, रबडी, बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडू, शेव नुकति (शेव बुंदी), रसमलाई, काजूकतली असे मिठाईचे विविध प्रकार राम उत्सवानिमित्त मिठाईच्या दुकानात उपलब्ध झाले आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. श्रीरामाचा प्रसाद म्हणून ‘जय श्रीराम’ नाम असणाऱ्या पेढ्यांना नागरिकांची अधिकची पसंती दिसून येत आहे. गृहसंकुले, कार्यालयातून या पेढ्यांना मागणी आहे. तसेच बुंदीचे लाडू, मोतीचूरचे लाडूदेखील नागरिक खरेदी करत आहेत. – देवाशिष दास, व्यवस्थापक, टिप टाॅप मिठाईवाला