ठाणे : मोबाईल सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या नावाने दोन ते तीन सिमकार्ड काढून त्यापैकी एक ग्राहकाला देऊन उर्वरित सिमकार्डचा बँक कर्ज वसुलीसाठी वापर केला जात असल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. ठाण्यातील एका महिलेने बँकेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही तिला कर्ज वसुली प्रतिनिधीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे बनावट सिमकार्डचे प्रकरण उघड झाले असून या प्रकरणी तीनजणांना ठाणे पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे.
मोबाईल सिमकार्ड कंपनीचा कर्मचारी राहुलकुमार टिळकधारी दुबे (३३), बँक कर्ज वसुली कंपनीचा मालक शुभम कालीचरण ओझा (२९) आणि टेलीकॉलर अमित मंगला पाठक (३३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ठाण्यातील एका महिलेने कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेले नव्हते. तरीही कर्ज वसुलीसाठी त्यांना बँक कर्ज वसुली प्रतिधीकडून फोन येत होते. या फोनद्वारे त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ करत अश्लील भाषेत बोलून नाहक त्रास दिला जात होता. या प्रकरणामुळे मानसिक त्रास होत असल्याने महिलेने ठाणे पोलिसांकडे तक्रार केली होती. यानुसार चितळसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मालोजी शिंदे यांनी सुरू केला होता. या तपासादरम्यान, बनावट सिमकार्डचे प्रकरण उघडकीस आले.
तक्रारदार महिलेला ज्या क्रमांकावरून फोन येत होते. त्याचा तपास पोलिसांनी केला. ज्या व्यक्तीच्या नावावर हा क्रमांक आहे. त्याने हे सिमकार्ड घेतलेच नसल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांच्या पथकाने सिमकार्ड विक्रि करणाऱ्या राहुलकुमार दुबे याच्याकडे चौकशी केली. यामध्ये त्याने कंपनीने दिलेले उदीष्ट पुर्ण करण्यासाठी ग्राहकांची फसवणुक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढतो आणि त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देतो तर, उरलेली सिमकार्ड लोन रिकव्हरी टेली कॉल सेटर सिटीझन कॅपीटल या कंपनीला विकतो, असे सांगितले. त्याआधारे पोलिसांनी कंपनीचा मालक शुभम आणि कर्मचारी अमित या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तक्रारदार महिलेने कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचेशी अश्लील वर्तन केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. राहुलकुमार, शुभम आणि अमित या तिघांना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : मुसळधार पावसात कल्याण-डोंबिवलीत तीव्र पाणी टंचाई
आम्ही कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते आणि कोणाला जामीनदारही नव्हता. काहीच संबंध नसतानाही आम्हाला नाहक मानसिक त्रास दिला जात होता. यापुर्वी अशाप्रकारच्या मानसिक त्रासातून काहीजणांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे मानसिक त्रास देणाऱ्यांना अद्दल घडावी यासाठी आम्ही पुढे येऊन ही तक्रार दिली होती. बँकांचा कर्ज वसुलीसाठी नेमलेल्या कंपनीवर वचक असायला हवा पण, तसे होत नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया तक्रारदाराने दिली.