ठाणे : येथील घोडबंदर परिसरात दुरचित्रवाहीनीवरील मालिकांच्या चित्रीकरणासाठी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस उपायुक्तांच्या स्वाक्षरीने बनावट परवानगी पत्र तयार करून दिल्याची बाब उघडकीस आली असून यासाठी त्या दोन ते चार हजार रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्या महिला पोलिस कर्मचारीविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नसून तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ज्योती अनुसे असे यातील निलंबित महिला पोलिस कर्मचारीचे नाव असून तिची पाच महिन्यांपुर्वी चितळसर पोलिस ठाण्यात नेमणुक झाली. यापुर्वी ती ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच (वागळे इस्टेट) कार्यालयात कार्यरत होती. घोडबंदर येथील बोरिवडे येथील रस्त्यावर एका मराठी वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. वागळे इस्टेट पोलिस उपायुक्त कार्यालयातून अशा मालिकांना चित्रकरणासाठी परवानगी देण्यात येते. या विभागात पोलिस शिपाई सागर ठाकरे हे काम करतात. त्यांनी बोरिवडे येथे सुरू असलेल्या चित्रीकरणाबाबत मालिका प्रोडक्शन व्यवस्थापक शंतनु तळकर यांच्याकडे परवानगीची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये असलेले पोलिसांच्या परवानगीचे पत्र दाखविले. या पत्रावर पोलिस उपायुक्त कार्यालयाचा शिक्का, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांची स्वाक्षरी होती.
हेही वाचा…डोंबिवलीत मांजराच्या पिल्लाला महिलेने पाचव्या माळ्यावरून फेकले
परंतु आपल्या विभागामार्फत असे कोणतेच परवानगी पत्र देण्यात आलेले नसल्याची बाब सागर ठाकरे यांच्या निदर्शनास आली. यामुळे त्यांनी याबाबत तळकर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, ज्योती अनुसे यांनी ही परवानगी दिल्याची माहिती समोर आली. या परवानगीसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. अनुसे यांना केवळ फोनवरून कळविले असता, त्यांनी व्हॉट्सॲपवर परवानगी पत्र पाठविली असून यापुर्वीही त्यांनी असे परवानगी पत्र दिलेले आहे. प्रत्येक चित्रीकरणाच्या परवानगीसाठी अनुसे यांना गुगल पे द्वारे दोन ते तीन हजार रुपये दिले आहेत, अशी माहिती तळकर यांच्या चौकशीतून समोर आली. याप्रकरणी सागर ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा देत अनुसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.