ठाणे : हिवाळा ऋतू म्हणजे विविध देशी फळांचा सुगीचा हंगाम. याच सुगीच्या हंगामात आता पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या डाळिंबांना चढे दर मिळू लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर डाळिंबाच्या खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. मागील एक दीड आठवड्याच्या कालावधीत नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली असल्याने किरकोळ बाजारात डाळिंबांची तब्बल २०० ते ३०० रुपये किलोच्या दराने विक्री केली जात आहे. यामुळे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असलेला ” भगवा ” जातीच्या डाळिंबाची सध्या फळबाजारात चलती दिसून येत आहे.
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात सफरचंद, सीताफळ तसेच डाळिंब यांची नागरिकांकडून चांगली मागणी असते. थंडी मध्ये आहारात विविध फळांचा नागरिक आवर्जून समावेश करत असतात. शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी, रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी थंडीच्या कालावधीत नागरिक प्रामुख्याने डाळिंबाचे सेवन अधिक करतात. यामुळे सफरचंदासह डाळिंबाला देखील याकालावधीत अधिक मागणी असते. याच पद्धतीने मागील काही दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या उपनगरातुन डाळिंबाला मोठी मागणी आहे. त्यातही सध्या व्रत – वैकल्यांचा मास असलेल्या मार्गशीष महिना सुरु असल्याने देखील फळांची बाजारात मोठी मागणी आहे.
महाराष्ट्रात डाळिंब लागवड पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, अहमदनगर,सांगली, नाशिक ह्या जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात देखील थोड्या बहू प्रमाणात डाळिंब लागवड केली जाते. डाळिंब हे एक बहुवार्षिक फळझाड आहे आणि त्यामुळे ह्याची एकदा लागवड केली की त्यापासून वर्षानुवर्षे उत्पादन हे मिळत राहते. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्नाचे एक मोठे स्रोत आहे. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या जिल्ह्यांतून सध्या डाळिंबांची आवक होत आहे. मात्र मागील आठवड्यात याची आवक कमी झाल्याने बाजारात डाळिंबाचे भाव वाढले आहेत. घाऊक आणि किरकोळ दोन्ही ठिकाणी डाळिंबाची चढ्या दराने विक्री केली आहे.
भगव्याचे वर्चस्व
डाळींबाची प्रामुख्याने गणेश आणि भगवा अशा दोन जाती असतात. यातील भगवा जातीची महाराष्ट्रात सर्वाधिक तर गणेश जातीची काही अंशी महाराष्ट्रात तसेच गुजरात, राजस्थान याठिकाणी लागवड केली जाते. महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या भगव्या जातीच्या डाळिंबाच्या कवचाचे आयुर्मान हे अधिक असल्याने फळ आठवडाभर ताजे दिसते आणि दाणे रसाळ देखील राहतात. यामुळे याच ग्राहकांकडून जास्त मागणी असते.
हेही वाचा : ठाणे ते दिवा आणि एरोली भागात तीन वर्षांत सुमारे चार हजार मोबाईल चोरी, दररोज सरासरी तीन ते चार मोबाईलची चोरी
सध्या किरकोळ बाजारात जम्बो साईझचे अर्थातच एका फळाचे वजन ३०० ग्राम इतके असलेल्या डाळिंब सुमारे २८० रुपये किलोने विकले जात आहे. तर इतर डाळिंब सध्या किरकोळ बाजारात १८० ते २२० किलोने विकले जात आहे.
मागील काही दिवसांपासुन डाळिंबांची आवक कमी झाली आहे. तसेच मागणी वाढल्याने डाळिंबांचे दर वाढले आहेत. हे दर पुढील आठवड्यापर्यंत अधिक वाढण्याची शक्यता आहे.
नंदलाल गुप्ता, फळ विक्रेते
तारिख – आवक
१० डिसेंबर – १२१० क्विंटल
११ डिसेंबर – १०४९ क्विंटल
१३ डिसेंबर – ८०१ क्विंटल
१६ डिसेंबर – ९५ क्विंटल
१७ डिसेंबर – ९०० क्विंटल
१८ डिसेंबर – ९९८ क्विंटल