ठाणे : अवजड वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील माजिवाडा पुलावर बुजविण्यात आलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उखडले आहेत. शिवाय, महामार्गावरील रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याचबरोबर महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्रातून विविध प्राधिकरणाचे रस्ते जातात. या रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात. परंतु हे रस्ते पालिका हद्दीत असल्यामुळे त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. यंदाही हेच चित्र दिसून येत आहे. ठाण्यातून जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. वसई, विरार, मिरा-भाईंदर, गुजरात, नाशिक, मुंबई आणि नवी मुंबई भागातील वाहतूकीसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली असून या वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गेच सुरू असते. मेट्रो प्रकल्पांमुळे हा रस्ता अरुंद झालेला असतानाच, त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. पुलांच्या पायथ्याशी तसेच महामार्गावर काही ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते. शिवाय, माजिवाडा उड्डाण पुलावरही खड्डे पडले आहेत. काही दिवसांपुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गासह उड्डाण पुलांवरील खड्डे भरणीची कामे केली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माजिवाडा पुलावर बुजवलेले खड्डे उख़डले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झाले आहेत. यात स्कुटर, रिक्षाचे चाक अडकून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डे चालकांना दिसून येत नसून या खड्ड्यांमध्ये वाहने आदळत आहेत. घोडबंदर मार्गावरही अनेक ठिकाणी बुजविलेले खड्डे उख़डले आहेत. शिवाय, महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या ना दुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा : २४ वर्षीय महिलेचा बदलापुरात विनयभंग, ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर केला आरोप

मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होत होती. तसेच या खड्ड्यांमुळे अपघातांची भिती व्यक्त होत होती. यावरून टिका होऊ लागताच ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी महामार्गासह उड्डाणपुलावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या. या आदेशानंतर ठेकेदारांनी अनेक भागातील खड्डे बुजविल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

हेही वाचा : कारण राजकारण: राज-शिंदे जवळीक राजू यांना तारक?

घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या माजिवाडा पुलाच्या मार्गिकेवरील गर्डरमधील जोडणीचे सांधे ना दुरुस्त झाल्याने दोन गटरमधील अंतर वाढले होते. त्याच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आले. या कामानंतरही आता पुन्हा जोडणी सांध्यातील अंतर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागाची पाहाणी करून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane potholes on ghodbunder road majiwada bridge and its service road css