ठाणे : गेले काही दिवस राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या वळीवाच्या पावसाचा परिणाम भाज्यांवर होऊ लागला आहे. भाज्यांच्या मोठे नुकसान झाल्यामुळे बाजारात आवक घटली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली. भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, फरसबी, कारले, वांगी आणि शिमला मिरचीचे दर किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. यंदा वळीव पावसाचा भाजी उत्पादनाला फटका बसला. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पिकवलेल्या भाज्यांची मोठी आवक होते. राज्यातील विविध भागांत झालेल्या वळीव पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आवक घटली आहे.
हेही वाचा : भाजप सत्तेत आल्यास मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत आठड्याभरापूर्वी दिवसाला १२० ते १५० गाड्या दाखल होत होत्या. गुरुवारपासून त्यात घट झाली. सध्या दिवसाला ९० ते ११० भाजीच्या गाड्या दाखल होत असल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. परिणामी, मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठेत भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाली. किरकोळ बाजारात भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, कारले, वांगी , शिमला मिरची या भाज्या प्रति किलो ६० ते ८० रुपयाने विकल्या जात आहेत. तर, फरसबीने किरकोळ बाजारात शंभरी पार केल्याचे ‘एपीएमसी’तील भाजी बाजाराचे उपसचिव मारुती पबितवार यांनी सांगितले.
भाज्या | आठवड्याभरापूर्वी (घाऊक किरकोळ) | सध्या (घाऊक किरकोळ) |
भेंडी | ३८ ६० | ४५ ८० |
दुधीभोपळा | २२ ६० | २५ ८० |
चवळी शेंग | ३० ६० | ४० ८० |
फरसबी | ९० १००-१२० | १०० १८०-२०० |
कारले | ४२ ५० | ४५ ६० |
वांगी | २४ ४० | ३४ ६० |
शिमला मिरची | ३५ ६० | ४५ ८० |