डोंबिवली : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन उपक्रमाने कोट्यवधी रुपये खर्च करुन बस थांबे उभारले आहेत. या बस थांबे असलेल्या भागातून परिवहन उपक्रमाच्या बस धावत नाहीत. त्यामुळे या बस थांब्याचा वापर परिसरातील रहिवासी वाहनतळ म्हणून उपयोग करत आहेत. केडीएमटी परिवहन उपक्रमाचे बस थांबे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. शहराच्या विविध भागातील केडीएमटी बस थांब्यांच्या बाजुला परिसरातील रहिवासी मोटार, रिक्षा, ट्रक आणून उभे करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ही खासगी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहन कोंडी होते. डोंबिवली पश्चिमेत केडीएमटीची बस प्रवासी वाहतूक करत नाही. तरीही मुख्य वर्दळीचे रस्ते महात्मा फुले रस्ता, पंडित दिन दयाळ रस्ता, रेतीबंदर रस्ता, उमेशनगर भागात प्रशासनाने बस थांबे उभारले आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी डोंबिवली पश्चिमेत केडीएमटीने बस सेवा सुरू केली होती. या बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. या प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत होता.

हेही वाचा : ठाण्यात ईदची मिरवणूक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी

राजकीय दबावातून या बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही, अशी कारणे देत प्रशासनाने डोंबिवली पश्चिमेतील बस सेवा बंद केली होती. या बस मार्गावरील बस थांबे कायम आहेत. त्यांचा वापर आता भिकारी, भटकी कुत्री, फेरीवाले सामान ठेवण्यासाठी करत आहेत. कल्याण पूर्व भागातही अशाच पध्दतीने बस थांबे उभारण्यात आले आहेत. पश्चिम भागातील बस थांब्याची दुर्दशा आहे. केडीएमटीच्या बस वेळेवर धावत नाहीत आणि त्यांची पाठोपाठ वारंवारिता नाही. केडीएमटीची बस वेळेवर येईल याची खात्री नाही. प्रवासी रिक्षा, इतर खासगी प्रवासी वाहतुकीला पसंती देतात.

हेही वाचा : डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर मित्रांचा सामुहिक लैंगिक अत्याचार

आकर्षक पध्दतीच्या या बस थांब्यांमध्ये १० ते १२ प्रवासी उभे राहू शकतील, अशी व्यवस्था आहे. मुसळधार पाऊस असला की बस थांब्यांमध्ये पावसाची झड येते. ज्या मार्गावरुन केडीएमटीची बस धावत नाही. या मार्गावरील रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बस थांबे केडीएमटी प्रशासनाने काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane private vehicles are parked at kalyan dombivli municipal transport bus stops css