ठाणे : कल्याण रेल्वेगाडीमध्ये सोमवारी रात्री एका प्रवासी महिलेच्या मोबाईलला अचानक आग लागल्याने गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी ही आग आटोक्यात आणली. सुमारे १५ मिनीटांनी ही रेल्वेगाडी कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
मुंबईहून कल्याणच्या दिशेने धिमी रेल्वेगाडी जात होती. रेल्वेगाडी रात्री ८ वाजून ११ मिनिटांनी कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एका महिलेच्या बॅगेमध्ये ठेवलेल्या मोबाईलमधून अचानक धूर निर्माण होऊन आग लागली. या घटनेनंतर महिलांच्या डब्यातील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. महिलांचा आरडाओरड करत घाबरून पळू लागल्या होत्या. गोंधळाची माहिती मोटरमन श्रवण कुमार यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्याकडील अग्निरोधक यंत्रणेच्या साहाय्याने मोबाईलला लागलेली आग विजविली. घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा स्थानकातील पोलीस कर्मचारी त्याठिकाणी गेले. त्यांनी गर्दी नियंत्रणात आणली. सुमारे १० ते १५ मिनीटे रेल्वेगाडी कळवा स्थानकात थांबविण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ही रेल्वेगाडी कल्याणच्या दिशेने रवाना झाली असे ठाणे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.