ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात क्षुल्लक कारणावरून एका हमालावर दोन तरुणांनी हल्ला केला. यात हमालाच्या डोळ्याजवळ दुखापत झाली आहे. भगवान देशमुख असे जखमी हमालाचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक आठवर रविवारी हमाल रेल्वेगाडीची प्रतिक्षा करत होते. त्यावेळी एका हमालाचा तेथे उभे असलेल्या तीन तरुणांसोबत वाद झाला. ते तरुण हमालाला शिवीगाळ करु लागले. त्यामुळे तेथे उभे असलेल्या हमाल भगवान देशमुख यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. रेल्वे सुरक्षा अधिकारी तेथे आल्यानंतर हमाल आणि तरुणामधील वाद मिटला. त्यानंतर ते तरुण तेथून निघून गेले. भगवान हे फलाट क्रमांक आठवर उभे असताना लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आली. त्यावेळी भगवान यांनी प्रवाशांच्या हातातील बॅग डोक्यावर घेतली. ते फलाटावरील जिने चढत असताना त्या तिघांपैकी दोन तरुण तेथे आले. त्यांनी भगवान यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका तरुणाने हातातील कड्याने भगवान यांच्या डोळ्याजवळ वार केला. तर दुसऱ्या तरुणाने भगवान यांच्या डोक्यात एका वस्तूने प्रहार केला.

या घटनेनंतर भगवान यांनी आरडओरड केली. त्यावेळी तेथील प्रवाशांनी एकाला पकडले. परंतु दुसरा तरुण तेथून पळून गेला. त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव रिंकु खतोरिया असल्याचे सांगितले. भगवान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रिंकुला ताब्यात घेतले आहे.