उल्हासनगर : पक्षांतर्गत गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता यामुळे उल्हासनगरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरखास्त केली होती. या बरखास्तीला ४ महिने उलटले तरी अद्याप नव्या शहराध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकांच्या तोंडावर उल्हासनगरातील मनसेला मात्र नेतृत्त्वच नसल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर शहरात गेल्या पालिका निवडणुकीत मनसेला भोपळा फोडता आला नव्हता. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पक्षाचा विस्तार होत नसला तरी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसे शहरात सक्रिय असल्याचे दिसून आले. याच काळा १४ मे २०२३ रोजी उल्हासनगर शहराच्या संघटनात्मक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर पक्षातील गटबाजी उघड झाली. त्यामुळे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उल्हासनगरची मनसे शहर कार्यकारिणी बरखास्त केली होती. यानंतर मनसे आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पुढील १० दिवसात नवी कार्यकारणी जाहीर करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते.

हेही वाचा : अपुऱ्या एसटी सेवेमुळे ग्रामीण भागात टंचाई; कोकणातील लोंढय़ामुळे ठाणे, पालघरमध्ये वाहतूक विघ्न

मात्र याला ४ महिने उलटले, तरीही अद्याप कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली नाही. कारण राज ठाकरेंनी केलेल्या कारवाईनंतरही पक्षातील अंतर्गत गटबाजी कमी न होता वाढली असून त्यामुळेच नेत्यांनाही शहराध्यक्ष निवडीचा निर्णय घेणे कठीण झाल्याची चर्चा उल्हासनगरात सुरू आहे. विशेष म्हणजे कार्यकारणी बरखास्त झाली असली, तरीही उल्हासनगरमध्ये विविध गट आंदोलने मात्र करत आहेत. पक्षाला एक नेतृत्व नसल्याने त्यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर येतो आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहे.

हेही वाचा : कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

शहराध्यक्ष पदासाठी स्पर्धा

उल्हासनगर शहराध्यक्ष पदासाठी सध्या मागील ६ वर्ष शहराध्यक्ष पदावर असलेले माजी शहराध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम केलेले विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन कदम, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार, यापूर्वी ५ वर्ष शहराध्यक्ष राहिलेले माजी शहराध्यक्ष संजय घुगे आणि कामगार सेनेचे दिलीप थोरात यांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी बंडू देशमुख, सचिन कदम आणि संजय घुगे यांना यापूर्वी संधी मिळालेली असल्याने मनोज शेलार आणि दिलीप थोरात यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane raj thackeray mns not appointed city president for ulhasnagar from last 4 months css