ठाणे : जिल्हा कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगाम २०२५ मध्ये भात पिकाखालील अपेक्षित लागवडीखालील क्षेत्र ५५ हजार हेक्टर एवढे ग्रहित धरले असून त्यासाठी शासनाकडे १० हजार १२० क्विंटल भात बियाणांची मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ४ लाख ९ हजार १८६ हेक्टर एवढे असून त्यापैकी खरीप हंगामा खालील सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार ९०९ हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मुख्यत: भात पिकाची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे भाजीपाला, चारापिके, कडधान्य व काही प्रमाणात गळीत धान्य इत्यादी पिकांचीही लागवड केली जाते. भातपिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५५ हजार हेक्टर एवढे असून मागील वर्षी ५४ हजार ९२३ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती व ४ हजार ९८९ हेक्टरवर इतर पिकांची लागवड करण्यात आली होती.

यंदाच्या खरीप हंगामामध्ये भात पिकाखालील अपेक्षित लागवडीखालील क्षेत्र ५५ हजार हेक्टर एवढे ग्रहित धरले असून त्यासाठी शासनाकडे १० हजार १२० क्विंटल भात बियाणांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांचे ८ हजार ८२० क्किंटल व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील १ हजार ३०० क्किंटल बियाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भाताचे अधिक उत्पन्न वाढण्यासाठी व संकरित पिकाखालील क्षेत्र वाढण्यासाठी १ हजार ३६० क्विंटल संकरित बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

येत्या खरीप हंगामात खतांची, बियाणांची विक्री आणि वितरणासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे याबद्दल कोणतीही अडचण येणार नाही यासाठी कृषी विभागाने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

खरीप हंगामाकरिता शासनाकडे १० हजार ३३४ मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून ठाणे जिल्ह्याकरिता ११ हजार १२२ मे. टन रासायनिक खते मंजूर करण्यात आली आहेत. सदर खतांमध्ये युरिया ९,२१५ मे टन, डीएपी १६७ मे टन, संयुक्त खते १,७०० मे. टन व इतर खते १४० मे. टन यांचा समावेश आहे.