ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील येऊर गावातील एका शेतघरात (फार्म हाऊस) सात जणांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम व्यवसायिक, त्यांचा मित्र आणि शेतघरातील कामगाराला दोरीने बांधून १९ लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी नेला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई येथील घाटकोपर भागात बांधकाम व्यवसायिक राहतात. त्यांचे येऊर येथे शेतघर आहे. बुधवारी सायंकाळी ते मित्रासोबत शेतघरावर गेले होते. त्यांचा मित्र दुसऱ्या शयनगृहात झोपले होते. तसेच शेतघरातील कामगारही तेथेच झोपला होता. मध्यरात्री शेतघराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. बांधकाम व्यवसायिकाने दरवाजा उघडला असता, सात जणांनी बंदूक, चाकू आणि लोखंडी सळई घेऊन घरात शिरले. त्यांनी बांधकाम व्यवसायिकाचे दोरीने हात, पाय बांधले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील प्लॅटिनम आणि सोन्याचे दागिने काढून घेतले. दरोडेखोरांनी रोकड मागितली असता, ती वाहनामध्ये असल्याचे बांधकाम व्यवसायिकाने सांगितले.

हेही वाचा : अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाची किल्ली घेतली. तसेच वाहनामधील ३५ हजार रुपयांची रोकड काढून आणली. त्यानंतर त्यांनी पुन्हा वाहनाची किल्ली बांधकाम व्यवसायिकाला आणून दिली. दरोडेखोर त्या बांधकाम व्यवसायिकाचे महागडे मोबाईल देखील घेऊन गेले. दरोडेखोर निघून गेल्यानंतर ते त्यांच्या मित्राला आवाज देऊ लागले. हात, पाय बांधले असल्याने ते लोळत त्यांच्या शयनगृहात गेले असता, त्यांच्या मित्राचे आणि कामगाराचे देखील हात पाय बांधल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या हाता पायाच्या दोरी सोडल्या. गुरुवारी पहाटे बांधकाम व्यवसायिकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १९ लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी नेल्याचे समोर आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane robbery at a builder s farm house at yeoor threatened with weapons css