ठाणे : ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात आलेला सिमेंट काँक्रीट तयार करण्याचा (आरएमसी) प्रकल्प नागरिकांच्या विरोधानंतरही सुरूच असल्याचे चित्र आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सुचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदाराने पुन्हा सुरू केला असून या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भितीने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्रित येऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीबरोबरच प्रकल्पाचा विरोध करणार आहेत.

हेही वाचा : शिळफाटा रस्त्यावरील टपऱ्या, गॅरेज, झोपड्यांवर कारवाई

ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या कामाकरिता घोडबंदर येथील कासारवडवली भागातील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात आरएमसी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या कामादरम्यान होणाऱ्या आवाजामुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजेच, या प्रकल्पापासून काही अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून प्रकल्पाच्या आवाजाचा त्रास वन्यजीवांवर होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर सिमेंटची पावडरच्या धुलीकणांमुळे लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यासह इतर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी भरवस्तीतून हा प्रकल्प हटविण्याबाबत विविध विभागांकडे तक्रारी करण्याबरोबरच निषेध व्यक्त केला होता. तसेच या प्रकल्पाबाबात नागरिकांकडून स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पाची पाहाणी केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून प्रकल्पाचे काम बंद केले होते. तसेच हा प्रकल्प नागरी वस्तीच्या किमान ५ किलोमीटर दूर अंतरावर त्वरीत स्थलांतरित करावा, अशी सुचना केली होती. यानंतर प्रकल्पाचे काम एक दिवस बंद झाले होते. परंतु हा प्रकल्प संबंधित ठेकेदाराने पुन्हा सुरू केला असून या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भितीने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्रित जमणार असून यावेळी प्रकल्प हटविण्याच्या मागणीसाठी नागरिक संकुलाच्या आवारात फेरी काढणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेऊन प्रकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविणार आहेत.

हेही वाचा : डोंबिवली जीमखाना रस्त्यावर पर्यटक बसचे अनधिकृत वाहनतळ, परिसरातील रहिवासी वाहन कोंडीने हैराण

घोडबंदर येथील कासारवडवली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे. ३० पेक्षा जास्त इमारती असून त्याठिकाणी ८ हजारहून अधिक रहिवाशी राहतात. त्याचबरोबर या संकुलाच्या परिसरातही गृहसंकुले उभी राहिलेली आहेत. या परिसरात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या वस्तीच्या परिसरातच सिमेंट काँक्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भिती व्यक्त होत आहे, असे नागरिकांकडून सांगण्यात आले.