ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा सोमवारी जाळला. त्याला अजित पवार गटाने प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला. या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक झाल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड येथे झालेल्या अजीत पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘साहेब म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागायची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल’ अशी टीका भुजबळ यांनी केली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करीत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

हेही वाचा – ठाण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळला भुजबळांचा पुतळा

शरद पवार गटाच्या या आंदोलनास अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. आमचे तसेच बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांनी काही कथित वक्तव्य केली म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यांना गद्दार म्हटले. मुळात गद्दार कोण हे या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून उत्तर दिले असून यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. हातात दोरा गंडा बांधून पुरोगामी भाषा करून कोणी बहुजन नेता होत नाही. यांचे ठाणे व येऊर येथील बंगल्यात काय धंदे चालतात, त्याची शोधपत्रकारिता करावी, अशी टिकाही परांजपे यांनी यावेळी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane sharad pawar group burnt the symbolic statue of bhujbal ajit pawar group burnt the symbolic statue of awhad ssb
Show comments