ठाणे : महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांविरोधातील उमेदवाराचा शिंदे सेनेत प्रवेश

विधानसभा निवडणूकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान, कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरात शिवसेना शिंदे गटाने आरती आयोजित केली होती. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.