ठाणे : अतिक्रमणे, पुर्नवसन यासारख्या जटील समस्यांमुळे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पात अडथळ्यांचा डोंगर उभा राहीला असताना राज्य सरकार आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या प्रकल्पातील ठाण्यापासून भिवंडीपर्यतच्या स्थानकांमध्ये पहिल्या टप्प्यात सेवा सुरु करण्याचा निर्णय जवळपास पक्का केला आहे. बाळकूम ते धामणकर नाकापर्यंत या प्रकल्पातील स्थापत्य कामे जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पुर्ण झाली असून पुढील नऊ स्थानकांची कामे मात्र रखडली आहे. हे लक्षात घेऊन कशेळी भागात कारडेपो उभारुन पहिला टप्प्यातील मार्गिका प्रवाशी सेवेसाठी खुली करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण या उन्नत मेट्रो मार्गाच्या उभारणीसाठी यापुर्वीच राज्य सरकारने ८,४१७ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची उन्नत मार्गिका ठाण्यातील कापूरबावडी येथून जुन्या ठाणे-भिवंडी रस्त्याने भिवंडी शहरात राजीव गांधी चौक येथून कल्याण रोडमार्गे राजनोली, दुर्गाडीपर्यत नेण्याचे ठरविण्यात आले होते. दुर्गाडी येथून पुढे कल्याण शहरातून ही मार्गिका कल्याण बाजार समितीपर्यत नेण्यात येणार आहे. या प्रकल्पात भिवंडी शहरात तीन किलोमीटर लांबीच्या अंतरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे येथे पुनर्वसन तसेच पुर्नवसाहती संबंधी अनेक समस्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आला आहे.
हेही वाचा : ठाण्यात रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव
पहिल्या टप्प्यातील कामे वेगाने
या प्रकल्पाचा पहिला टप्पा १२.७ किलोमीटर अंतराचा असून त्यामध्ये बाळकूम नाका, कशेळी, काल्हेर, पुर्णा, अंजूरफाटा, धामणकरनाका या सहा स्थानकांचा समावेश आहे. यापुढे भिवंडी, गोपाळनगर, टेमघर, राजणोली, गोवे गाव, कोण गाव, लाल चौकी, कल्याण स्थानक आणि कल्याण बाजार समिती अशी नऊ स्थानके येणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या कामात फारसे अडथळे नसल्याने या स्थानकांच्या उभारणीची कामे वेगाने सुरु असून सप्टेंबर २०२३ पर्यत या मार्गिकांचे ८० टक्के काम पुर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सुत्रांनी लोकसत्ताला दिली. भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्यात राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, टेमघरपर्यत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा प्रश्न आहे. त्यामुळे धामणकर नाका ते टेमघर या साडेतीन किलोमीटर अंतराचा मार्ग उन्नत ऐवजी भूमीगत करण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आला आहे.
हेही वाचा : टीएमटीची डोंबिवली-दिवा बससेवा सुरू
पहिला टप्पा लवकर सुरु करण्याच्या हालचाली
दरम्यान, या प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कामांमधील अडथळे लक्षात घेता पहिल्या टप्प्यातील सहा स्थानके प्रवाशी सेवेसाठी सुरु करता यावीत यासाठी आता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रकल्पात कारशेडची जागा सुरुवातीला कोणगाव येथे तर स्टॅबलिंग यार्ड कल्याण एपीएमसी येथे करण्याचे प्रस्तावित होते. दुसऱ्या टप्प्यातील अडथळे लक्षात घेता कशेळी येथे कारशेड उभारण्याचा निर्णयही सरकार स्तरावर यापुर्वीच घेण्यात आला आहे. यासंबंधीची निवीदा प्रक्रिया नुकतीच पुर्ण करण्यात आली असून बाळकून नाका ते धामणकर नाक्यापर्यतची मार्गिका ही कामे पुर्ण होताच सुरु केली जाईल, अशी माहिती एमएमआरडीएमधील सुत्रांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील कामेही वेगाने पुर्ण करण्याचे ठरिवण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्यातील स्थानकांची कामे ८० टक्कपर्यत पुर्ण झाली आहेत. त्यामुळे कारशेड या स्थानकाच्या जवळ आणण्यात आल्याने पहिला टप्पा सुरु करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, असेही सुत्रांनी स्पष्ट केले.