ठाणे: पश्चिम रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना व्हावा या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने सॅटीस पुलाखालील परिसर फेरिवालामुक्त केला आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून गर्दीच्यावेळेत काही रिक्षाचालक थांबा सोडून फेरिवालामुक्त झालेल्या भागांमध्ये रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट अडवित आहे. त्याचबरोबर थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे. याठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांदेखतच हे प्रकार सुरू असल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी दररोज कामानिमित्त वाहतूक करतात. अनेक प्रवासी दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने घर ते स्थानकापर्यंतचा प्रवास करतात. तर, अनेक नागरिक बस, रिक्षाने घर ते स्थानकापर्यंतचा प्रवास करतात. या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सॅटीस पुलाखाली रिक्षांकरिता स्वतंत्र थांबा आहे. याठिकाणी नागरिकांना रिक्षा उपलब्ध व्हावी आणि रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी लोखंडी मार्गरोधक बसविण्यात आलेले आहेत. याच भागातून रिक्षाचालकांनी प्रवाशांची वाहतूक करणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभ्या करित आहेत. यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नाहीत.

हेही वाचा… कल्याण तळोजा मेट्रो १२ च्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार

पश्चिम रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना व्हावा या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनाने सॅटीस पुलाखालील परिसर फेरिवालामुक्त केला आहे. यामुळे नागरिकांना परिसरातून चालणे शक्य होत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही रिक्षाचालक थांबा सोडून फेरिवालामुक्त झालेल्या भागांमध्ये रिक्षा उभ्या करून प्रवाशांची वाट अडवित आहे. थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे. एकीकडे परिसर फेरिवालामुक्त झाला असला तरी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवाशांना मुक्तपणे प्रवास करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. याच परिसरात वाहतूक पोलिसांची चौकी असून त्याचबरोबर याठिकाणी वाहतूक पोलिसही तैनात असतात. त्यांच्या देखतच रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र उभे राहून रस्ते अडवित आहेत. त्यावर कारवाई होत नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.

ठाणे स्थानकातून प्रवाशांना रिक्षा उपलब्ध व्हावी यासाठी सॅटीस पुलाखाली रिक्षा थांबा उभारण्यात आलेला आहे. या थांब्यावरूनच रिक्षांची रांगेत वाहतूक व्हावी यासाठी येथे लोखंडी मार्गरोधक बसविण्यात आलेले आहेत. या थांब्याच्या बाजूलाच टॅक्सीचा थांबा असून त्याची स्वतंत्र मार्गिका आहे. येथूनच दुचाकी आणि इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. याच मार्गिकेतून काही चालक रिक्षा नेऊन पुढे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या करतात.

ठाणे स्थानक परिसरात थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभी करणाऱ्या चालकांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. – विनयकुमार राठोड, वाहतूक शाखा उपायुक्त

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane station area rickshaw drivers are blocking the way of passengers and parking rickshaws in hawker free areas dvr