ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील रस्ते आणि पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर मंगळवारी सायंकाळी पालिका पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी केलेल्या दगडफेकीत दोन वाहनांचे नुकसान तर मारहाणीत एक कामगार जखमी झाला आहे. या घटनेनंतर फेरीवाले मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. फेरीवाल्यांनी मात्र कोणताही हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक १६ वरील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी अडविले होते. याबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी रात्री कारवाईसाठी गेले. याठिकाणी असलेल्या २५ ते ३० टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केला. या विरोधानंतर पथकाने कारवाई केली.
हेही वाचा : रेल्वे मार्गावर जिना नसल्याने डोंबिवलीतील आयरे, देवीचापाडा येथील नागरिकांचा रेल्वे मार्गातून प्रवास
कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीवर दगड मारण्यात आला. यामध्ये या गाडीची काच फुटली. तसेच एका कामगाराला मारहाण झाली. प्रसंगावधान राखत गाडीच्या चालकाने गाडी सोडून त्या ठिकाणाहुन पळ काढला. तर फेरीवाल्यांकडून आणखी एका वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे. दरम्यान पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्याही फाडल्या जातात. पालिकेकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे.