ठाणे : ठाण्यातील शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने भाजपाने आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे पालिकेची निवडणुक होईल, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु अद्यापही पालिकेची निवडणुक जाहीर झालेली नाही. असे असले तरी आता पुन्हा दिवाळीनंतरच पालिका निवडणुका होतील, असे अंदाज बांधले जात असतानाच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या पक्षाची शहरात ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून यातूनच अन्य पक्षातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरूच आहेत.
असे असतानाच ठाण्यातील शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ आणि विकसित देश घडविण्यासाठी भाजपाबरोबर आलो असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
लॉरेन्स डिसोजा कोण आहेत
ठाणे महापालिकेत २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर माजिवडा गाव परिसरातून लॉरेन्स डिसोझा निवडून आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या स्टेफनी डिसोझा यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख रामेश्वर बचाटे, आंबेडकरी चळवळीतील महेश चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला.
भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्राधान्य
ठाणे शहरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार आजचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या वेळी माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंब्रे, सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, ओवळा-माजिवाडा मंडल अध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.