ठाणे : शिळ डायघर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कार्यशाळेतून साहित्य चोरीला गेले आहे. याप्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तक्रार दिल्यानंतर शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिळ डायघर येथील खर्डीगाव परिसरात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या विद्यालयातील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी विविध उपकरणे ठेवली जातात. शनिवारी सायंकाळी महाविद्यालयातील विद्यार्थी निघून गेले. यानंतर कार्यशाळा बंद करण्यात आली.
हेही वाचा : विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ
रविवारी सकाळी महाविद्यालयाचे शिपाई कार्यशाळेजवळून फेरफटका मारत असताना त्यांना येथील लोखंडी जाळी आणि ग्रील तोडण्यात आल्याचे आढळून आले. शिपायाने तात्काळ याची माहिती महाविद्यालयाच्या शिक्षक आणि प्राचार्यांना दिली. प्राचार्य कार्यशाळेत गेले असता, त्यांना कार्यशाळेतील ४२ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य आढळून आले नाही. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.