ठाणे : मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने काही बेजबाबदार मतदार सुट्टी निमित्ताने गावी किंवा फिरण्यासाठी जात असतात. परंतु ठाण्यातील एका चर्चमधील सुमारे पाच हजार सदस्यांनी मतदान करण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार असल्याची शपथ घेतली. तसेच येत्या काही दिवसांत चर्चचे सदस्य शहरात मतदान वाढविण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे चर्चच्या सदस्यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी कार्यालयीन सुट्टी मिळत असते. परंतु काहीजण या सुट्टीचा गैरफायदा घेत बेजबाबदारपणे मतदान करणे टाळत सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरत असतो. शासनाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यास ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे.
चर्चचे फादर जॉन आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार सदस्यांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ चर्चमध्ये घेतली आहे. येत्या काही दिवसांत ठाणे जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातून मतदानासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करणार आहोत, अशी माहिती बॉम्बे कॅथोलिक सभेचे कार्यकारी समिती सदस्य कॅस्बर ऑगस्टीन यांनी दिली.