लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: विविध हिंदी मालिका, वेबसिरीजमध्ये सह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या तीन मुलींची ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली. या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. विविध हिंदी मालिका वेबसिरीजमध्ये सह अभिनेत्री म्हणून तीन तरुणी काम करत होत्या.

काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेसोबत झाली होती. या तरुणींना मुंबई आणि ठाण्यातील पंचतारांकित उपाहारगृहात बोलावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने संबंधित वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला संपर्क साधला.

हेही वाचा… कल्याण: कडोंमपातील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे ठराविक ठेकेदारांच्या घशात; स्पर्धक ठेकेदाराची आयुक्तांकडे तक्रार

तसेच बनावट ग्राहक बनवून त्यांना सोमवारी कॅसलमील येथील एका मोठ्या उपाहारागृहात बोलावले. महिला त्या उपाहारगृहात आली असता, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी तिच्या तावडीतील तीन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.