ठाणे : ठाणे शहरातील बाळकुम परिसरात वाहनाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी असलेली सिग्नल यंत्रणा शुक्रवारी सकाळच्या दरम्यान अचानक बंद पडली. यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली. अचानक झालेल्या या बिघाडामुळे वाहनांच्या रांगा साकेत पर्यंत लागल्याचे पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना नाहक त्रस्त सहन करावा लागला.
ठाणे शहरातील बाळकुम परिसरात असलेली सिग्नल यंत्रणा शुक्रवारी सकाळी बंद पडली. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत होते. या वाहतूक कोंडीमुळे बाळकुम ते साकेत आणि कापूरबावडी मार्गे ठाणे स्थानकापर्यंत जाण्यासाठी असलेल्या मार्गिकेवर वाहतूक ठप्प झाली होती. विशेषत: कामावर जाणाऱ्या नागरिकांना या कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास लागत आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये कामावर जाणारे नागरिक तसेच महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी अडकले होते.
बाळकुम परिसरातील नाक्यावरून भिवंडी, कापूरबावडी आणि माजिवड्याच्या मार्गाने ठाणे स्थानकाकडे जाणारे नागरिकही या कोंडीत अडकले होते. नागरिक या परिस्थितीमुळे संताप व्यक्त करत असून सिग्नल यंत्रणेची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करत आहेत. प्रमुख रस्त्याला लागून असणाऱ्या मर्गिकांमध्ये कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.