कल्याण : सैंधव मीठ विक्री करण्यासाठी पंजाबमधून आलेले विक्रेते त्यांच्या ट्रॅक्टर ट्राॅली शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी ते कल्याण फाटा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करतात. मीठ खरेदीसाठी येणारे घाऊक, किरकोळ विक्रेते आपली वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. यामुळे शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी दररोज सकाळ, सायंका‌ळ वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच ते सहा किलो वजनाचे सैंधव मीठाचे तुकडे ट्रॅक्टर ट्राॅली, टेम्पोमध्ये भरून दरवर्षी पंजाबमधील विक्रेते ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात येतात. कल्याण-शिळफाटा रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. हा रस्ता नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत शहरांना जोडणारा आहे. या रस्त्यावर सैंधव मिठाची घाऊक, किरकोळ विक्रेत्यांकडून अधिक प्रमाणात खरेदी होते. अनेक वाहन चालक रस्त्यावर थांबून मीठ खरेदी करतात. काही विक्रेते आपली वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे मीठ विक्री करणाऱ्या वाहनांच्या परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत ‘चला होऊ द्या चर्चा’ सभेला परवानगी नाकारली, डोंबिवलीत ‘उबाठा’चा मूक मोर्चा

वाहतूक विभागाने मीठ विक्रेत्यांना शिळफाटा रस्त्यालगतच्या अंतर्गत भागात किंवा शिळफाटा चौकापासून मुंब्रा शहर, दहिसर मोरी परिसरात वाहने उभी करून व्यवसाय करण्याची सूचना करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत अनेक वाहन चालक आकर्षक दिसणारे सैंधव मिठाचे खडे खरेदी करण्यासाठी झुंबड करतात. त्यामुळे मीठ विक्री वाहनांजवळ सायंकाळच्या वेळेत सर्वाधिक गर्दी होते. या गर्दीचा फटका शिळफाटा रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना बसतो. ठाणे ते पनवेल, नवी मुंबई ते कल्याण दरम्यान वाहतूक करणारी वाहने कल्याण फाटा येथून वाहतूक करतात. कल्याण फाट्याच्या चारही बाजुने खडे मीठ विकणारे विक्रेते आपले ट्रॅक्टर, टेम्पो घेऊन उभे असतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic jam on kalyan shil phata road due to tractors of rock salt sellers parked on both sides css
Show comments