ठाणे : गुढीपाडवा सणानिमित्ताने ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी ३० मार्चला, रविवारी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. रविवारी सकाळी ६ वाजेपासून हे वाहतुक बदल लागू असतील.
डाॅ. मूस चौक येथून साईकृपा उपाहारगृहाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डाॅ. मूस चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने जांभळीनाका, चिंतामणी चौक मार्गे वाहतुक करतील. अल्मेडा रोड, वंदना रोड येथून गजानन महाराज चौक मार्गे राम मारूती रोड परिसराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वंदना टी पाॅइंट येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खोपट, चरई, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. गोखले रोड, राम मारूती रोड येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गोखले रोड येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन हात नाका मार्गे वाहतुक करतील. टाॅवर नाका येथून गडकरी रंगायत चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना टाॅवर नाकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. तीन हात नाका येथून हरिनिवास चौक, मल्हार सिनेमा मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या टीएमटी बसगाड्यांना तीन हात नाका चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. टीएमटी बसगाड्या नितीन कंपनी, टीएमसी चौक, अल्मेडा रोड, खोपट, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. सत्यम कलेक्शन दुकानाजवळून विष्णुनगर मार्गे नौपाड्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना विष्णुनगर येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सत्यम कलेक्शन येथून सरळ घंटाळी मंदिर, तीन पेट्रोल पंप मार्गे जातील.
वाहने उभी करण्यास बंदी- चिंतामणी चौक ते गडकरी रंगायतन चौक परिसरात तलावाच्या बाजूस तसेच सेंट जाॅन द बॅपिस्ट शाळेच्या मागील बाजूकडील दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल. गडकरी रंगायतन चौक ते डाॅ. मूस चौकाच्या दोन्ही दिशेला, गजानन महाराज चौक ते गोखले रोड दरम्यान राम मारूती रोडवरील दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास मनाई आहे.
कोर्टनाका, जांभळीनाका आणि मुख्य बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आनंदआश्रम मार्गे वाहतुक करतील. महागिरी, खारकर आळी येथून जांभळीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना महाजनवाडी सभागृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने महाजनवाडी सभागृह, कोर्टनाका मार्गे वाहतुक करतील.