ठाणे : पनवेल कळंबोली येथे शनिवारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने कोकणातील प्रवाशांनी दिवा स्थानकात रुळावर उतरून रेल रोको केला. त्यामुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ९ वाजता हा रेलरोको सुरू झाला होता. त्यांनतर पोलिसांनी सकाळी १० वाजता आंदोलकांना बाजूला केले. त्यांनतर वाहतूक सुरू झाली. परंतु रेल्वे गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्याने रेल्वे वेळापत्रक कोलमडले आहे.
पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे शनिवारी दुपारी रुळावरून घसरले होते. या मालगाडीवर लोखंडी क्वाईल होते. डबे रुळावर आणताना प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे दिवसभर या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून कोकणात कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांना कोकणात जाता आले नाही. प्रवासी रात्रीपासून रेल्वे स्थानकांत रेल्वे गाडीची प्रतीक्षा करत होते.
हेही वाचा : मराठवाड्याचे मागासलेपण दूर करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रविवारी सकाळी ९ वाजता दिवा स्थानकात काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून उपनगरी रेल्वे गाडी अडविली. त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदार, महिला प्रवाशांचे हाल झाले. एक तास रेलरोको सुरू होते. उपनगरीय प्रवाशांना नेमके काय घडले आहे याबद्दल माहिती मिळत नव्हती. त्यामुळे काही प्रवासी रुळांवरून चालत निघाले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी रेलरोको करणाऱ्यांना बाजूला केले. त्यांनतर येथील वाहतूक सुरू झाली. या रेल्वे रोकोमुळे उपनगरीय रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे.