ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून कर्जत, कसारा, बदलापूर भागातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या सुमारे पाच ते २० मिनीटे उशीराने धावत असल्याने नोकरदार आणि प्रवासी हैराण झाले आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने या रेल्वेगाड्या उशीराने धावत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे. उशीराने धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
कर्जत, कसारा, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. कमी किंमतीत घरे मिळत असल्याने नागरिक याठिकाणी घर घेण्यास प्राधान्य देत आहे. येथील नोकरदार ठाणे, मुंबईत कामानिमित्ताने येत असतात. तसेच शहापूर, मुरबाड भागातील अनेकजण उपचारासाठी ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात येण्यासाठी रेल्वे मार्गेच प्रवास करत असतात. त्यामुळे येथील रहिवाशांना प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. असे असले तरी या भागात पुरेशा रेल्वेगाड्या उपलब्ध नसतात. सकाळच्या वेळेत रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेकांना उभ्याने प्रवास करत कामाच्या ठिकाणी जावे लागते.
हेही वाचा : ठाण्यात दिघे साहेबांच अस्तित्व कोण पुसतयं ? आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचा सवाल
गर्दीमुळे प्रवासाचा शारीरिक त्रास सहन करावा लागत असताना काही दिवसांपासून सकाळी आणि रात्रीच्या अनेक रेल्वेगाड्या रखडत रखडत जात आहे. तसेच काही रेल्वेगाड्या त्यांच्या ठराविक वेळत सुटत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहे. त्यासंदर्भात प्रवाशांकडून समाजमाध्यमांद्वारे रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे. रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य देत आहे. त्याचा परिणाम आम्हाला सहन करावा लागत आहे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे दररोज सकाळी आणि रात्री अनेक रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे पाच ते २० मिनीटे उशीराने होत असल्याचा आरोपही प्रवासी करत आहेत.
हेही वाचा : ठाणे: फुटीच्या चर्चेवर काय म्हणाले राजन विचारे…
आसनगाव येथील प्रवासी उमेश विशे म्हणाले, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने त्याचा परिणाम उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर होत आहे. मी स्वत: कुर्ला येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहे. घरातून वेळेवर निघालो तरी रेल्वेगाड्या उशीरा धावतात. त्यामुळे सुमारे २० मिनीटे उशीराने शाळेत पोहचावे लागते. कसारा भागातील प्रवाशांच्या समस्येकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही.
उपनगरीय गाड्या उशीराने धावण्याची कारणे वेगवेगळी तसेच ती तात्पुरती व तात्कालीक असतात. उपनगरीय तसेच सर्वच रेल्वे गाड्यांचा वक्तशीरपणा नियमितपणे पाळला जाईल याकडे विशेष लक्ष देण्यात येते.
प्रविण पाटील (वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे)