ठाणे : डिजीटल अटकेची भिती दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. रौचक श्रीवास्तव (२९) आणि संदीप यादव (२६) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आतापर्यंत ५९ जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी फसवणूक केलेली रक्कम आभासी चलनामध्ये परावर्तित केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख ६५ हजार रुपयांची रोकड, पाच मोबाईल, एक मोटार, एक बॅग, सहा सिमकार्ड, २० डेबिट कार्ड, बँकांचे नऊ धनादेश असा मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणूक झालेले वृद्ध व्यक्ती रहेजा गार्डन परिसरात राहतात. २५ नोव्हेंबरला त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधून तो गुन्हे अन्वेषण विभागाचा (क्राईम ब्रांच) अधिकारी असल्याची बतावणी केली. तसेच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणात अटक टाळण्यासाठी त्यांनी वृद्धाकडून पैशांची मागणी केली. त्यानुसार, फसवणूक झालेल्या वृद्धाने ८ लाख ६५ हजार १५३ रुपये आरटीजीएसद्वारे त्यांना पाठविले. वृद्धाच्या मुलीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने, प्रवीण सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, फसवणूक करणारे उत्तरप्रदेशातील लखनौ भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार,पोलिसांचे पथक लखनौ येथे गेले. तेथून त्यांनी रौचक आणि संदीप या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या दोघांच्या बँक खात्याची तपासणी केली असता, त्यांनी ५९ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. फसवणूक केलेली रक्कम आभासी चलनामध्ये परावर्तित करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

Story img Loader