ठाणे : नवी मुंबईत खासदार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन केले. त्यामुळे थेट माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर खंडणीचा बनाव करत अटकेची कारवाई करण्यात आली. असा आरोप ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. तुम्ही करारे कितीही हल्ला लई मजबूत मविआचा किल्ला असेही त्या म्हणाल्या. तर मढवी यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचे व्हिडीओ आणि ऑडिओ पुरावे आहेत असा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.
नवी मुंबई येथील ऐरोली भागात एम. के. मढवी हे नवी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवक होते. शिवसेनत फूट पडल्यानंतर एम. के. मढवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. खासदार राजन विचारे यांचे ते निकटवर्तीय आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका कंपनीने कळवा येथे राहणाऱ्या ठेकेदाराला भूमिगत इंटरनेट तारा टाकण्याचे काम देण्यात आले होते. हे खोदकाम सुरू असताना मढवी यांनी ठेकेरादाराला त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. तसेच तो कळवा येथे त्याच्या घरी असताना त्याला संपर्क साधून त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम दिली नाही, तर काम बंद पाडू असे मढवी यांनी म्हटले होते. त्यानंतर मढवी यांच्यासोबत मोबाईलवर झालेले संभाषण ठेकेदाराने त्याच्या मोबाईलमध्ये रेकाॅर्ड केले होते. तर २६ एप्रिलला अडीच लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये घेतानाचे मोबाईलद्वारे छुपे चित्रीकरणही ठेकेदाराने केले होते. त्यानंतर ठेकेदाराने ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. शनिवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी ऐरोली येथे मढवी यांच्या पक्ष कार्यालयामध्ये सापळा रचला. त्यावेळी मढवी यांनी त्यांचा चालक अनिल मोरे यांच्या मार्फत ठेकेदाराकडून एक लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगेहात पकडले असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना झटका! ऐन निवडणुकीच्या काळात मनोहर मढवींना खंडणी प्रकरणात अटक
या कारवाईनंतर आता ठाकरे गटाकडून या कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका केली. निवडणूक हातातून जाते, हे लक्षात आल्यानंतर आता सरकारकडून दडपशाहीला सुरुवात केली. नवी मुंबईत राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन केले. थेट माजी नगरसेवक एम के मढवी यांच्यावर खंडणीचा बनाव करत अटकेची कारवाई, तुम्ही करारे कितीही हल्ला… लई मजबूत मविआचा किल्ला, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.