ठाणे : गद्दारांना क्षमा नको आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या असे म्हणत ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. महायुतीचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांचे राजन विचारे यांच्यासमोर आव्हान आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार असले तरी, हा मतदारसंघ महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना(शिंदेगट) खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरेगट) माजी खासदार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दाखवून दिले होते. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजन विचारे ४८ हजार मतांनी पिछाडीवर होते. तर, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजीवडा या मतदारसंघातही विचारे यांना मोठा फटका बसला. परंतू, शिंदे यांच्या पक्षातील एक मोठा गट भाजप आमदार संजय केळकर यांच्या विरोधात आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे काही निकटवर्तीय देखली आग्रही होते. परंतू, या मतदारसंघातून केळकर यांना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच माजी नगरसेवक संजय भोईर यांनी बंड पुकारल्याचे चित्र आहे.
तर, विचारे हे २००९ मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या पार्शभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाने माजी खासदार राजन विचारे यांनाच ठाणे शहर विधानसभा मतदार संघातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. राजन विचारे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी चरई येथील त्यांच्या कार्यालयापासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ही दर्शन घेतले. तर, अर्ज दाखल केल्यानंतर दिघे यांच्या शक्तीस्थळावर दर्शन घेऊन सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी गद्दारांना क्षमा नाही आणि निष्ठावंतांचे अस्तित्व टिकू द्या, यासाठी आपले शिलेदार राजन विचारे यांचा सर्वाधिक मतांनी विजय व्हावा असे म्हणत गाऱ्हाणे घातले.