ठाणे : विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाने राज्यात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याची सुरुवात आज, रविवारपासून ठाण्यात होत आहे. या मेळाव्यास खासदार संजय राऊत यांच्यासह महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या ठाण्यातून शिवसेना फुटली. त्याच ठाण्यातून कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, अनंतर गिते, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू उपस्थित राहणार आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते त्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेना फुटली. त्यानंतर ठाकरे यांच्या सोबत असलेले अनेक पदाधिकारी आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कोकणातील ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणूकांनंतर पक्षाला गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाने कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याची सुरूवात ठाण्यातून होणार आहे.

ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. माजी खासदार राजन विचारे वगळता, ठाण्यातील बहुतांश महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. हा मेळावा आता ठाण्यात होणार असल्याने मेळाव्याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. ठाण्यापासून सुरू होणारा हा मेळावा राज्यभरात घेतला जाणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता ठाण्यातील खारकर आळी येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, अनंतर गिते, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू उपस्थित राहणार आहे. हे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे संदेश प्राप्त झाले आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही ‘धर्मविरांच्या ठाणे नगरीत स्वागत’ अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमावर पाठविण्यास सुरूवात केली आहे.

Story img Loader