उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका प्रशासनाने ९५१ कोटी रूपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी लागू केलेल्या अभय योजनेत ४९ कोटी ५३ लाख रूपये वसूल करण्यात यश आले आहे. पालिका प्रशासन या वसुलीवर समाधान व्यक्त करत असले तरी पालिका प्रशासनाने २२ मार्चपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. पालिकेने १८ मार्चपर्यंत १२३ कोटी कर वसूल केला आहे. त्यामुळे अखेरच्या चार दिवसात किती वसुली होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वर्षानुवर्षे अभय योजना लागू करून मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या उल्हासनगर महापालिकेला यंदाच्या वर्षातही सरासरी वसुली करता आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता कराची चालू मागणी ११७ कोटी ८० लाख होती. तर मालमत्ता कराची थकबाकी तब्बल ९५१ कोटी १० लाख ७९ हजार ४५८ रूपये इतकी होती. एकूण १ लाख २९ हजार ९२४ मालमत्ता धारकांकडून ९५१ कोटींच्या वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेने २४ फेब्रुवारीपासून अभय योजना लागू केली होती. पहिल्या टप्प्यात थकबाकीसह चालू कराची रक्कम एकरकमी भरल्यास शास्ती १०० टक्के माफ करण्यात आली होती. या पहिल्या टप्प्यात ४२ कोटी ४६ लाखांची वसूली करण्यात आली. मात्र ही पहिल्या टप्प्यातली अपेक्षित वसुली नसल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली होती.

दुसऱ्या टप्प्यात ७५ टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. मात्र या काळात अवघ्या ३ कोटी ४३ लाखांची वसूली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले. मगंळवार, १८ मार्च रोजी अभय योजनेची मुदत संपली. संपूर्ण अभय योजनेच्या काळात पालिकेच्या तिजोरीत अवघे ४९ कोटी ५३ लाख ९९ हजार ४६७ रूपये जमा झाले. तर चालू वर्षात एकूण १२३ कोटी ७६ लाख ३९ हजार ३५२ रूपये कररूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या अभय योजनेत अवघे ३१ कोटी रूपयांची वसुली झाली होती. त्यामुळे यंदा समाधानकारक वसुली झाल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी दिली आहे.

अभय योजनेला मुदतवाढ

येत्या २२ मार्च रोजी लोक अदालत संपन्न होणार आहे. त्यामुळे अभय योजनेला येत्या २२ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी घेतला आहे. त्यामुळे २२ मार्चपर्यंत थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम ५० टक्के शास्तीसह भरल्यास उर्वरीत ५० टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या शेवटच्या टप्प्यात थकबाकीसह चालू कराचा भरणा करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Story img Loader