ठाणे : उपवन येथील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हुक्का पार्लर चालविणाऱ्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे शहर तसेच विविध भागातून उपवन येथील तलावाकाठी तरुण-तरुणी फिरण्यासाठी येत असतात. या भागात अनेक मोठे हाॅटेल, उपाहारगृहे आहेत. उपवन तलावाजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर प्रवेशद्वाराजवळील एका हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे, वर्तकनग पोलीस ठाण्याचे कर्मचारी हुक्का पार्लरमध्ये गेले. हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याप्रकरणात पोलिसांनी हुक्का पार्लरचे सर्व साहित्य जप्त केले. तसेच हुक्का पार्लरमधील व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ अंतर्गत कलम २१ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे शहर हुक्का पार्लरचे अड्डे

पोखरण रोड दोन आणि एक परिसरात अनेक टपऱ्यांवर अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी उपवन तलावाकाठी अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी वापरलेल्या इंजेक्शनचा साठा देखील आढळून आला होता. तसेच गांजा सेवन, अमली पदार्थांची विक्री असे प्रकार देखील येथे समोर आले होते. हुक्का पार्लरचा विलखा देखील येथे आहे.

ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील हुक्का पार्लर आणि अमली पदार्थांच्या विक्री विषयी आंदोलन देखील केले होते. हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर तीन वर्षाची शिक्षा आहे, पण ठाणे शहरात हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखल होत नाहीत, अशी खंत देखील आमदार संजय केळकर यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकंडे व्यक्त केली होती.

तसेच पोलिसांनी कारवाया केल्याने ६० टक्के हुक्का पार्लर बंद झाले, पण अद्याप ४० टक्के पार्लर सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी सभागृहात दिली होती. ठाणेकर तरुणांना देशोधडीस लावणारे हे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद न करण्यामागे कोणते राजकारण आहे, अर्थकारण आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.