डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा गाव येथील उंबार्ली रस्त्याच्या रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातर्फे सुरू आहे. या कामाच्या पुढील टप्प्याचे रूंदीकरण काम शुक्रवारी सुरू असताना मानपाडा गावातील स्थानिक महिलेने कामाच्या ठिकाणी येऊन पालिका कर्मचाऱ्यांना शिवागाळ केली. लाकडी दांडके घेऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेली. या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.
चंद्रमा काळुराम ठाकूर (३६) असे रस्ते कामाला विरोध करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिले विरूध्द पालिका ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी केली. पोलिसांनी आरोपी चंद्रमा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, डोंबिवली जवळ शिळफाटा रस्त्यालगत मानपाडा गाव हद्दीत उंबार्ली रस्ता आहे. शिळ रस्त्याला असलेला हा पोहच रस्ता मानपाडा गाव, विद्यानिकेतन शाळा, भरारी अपंगालय रस्त्यावरून पुढे उंबार्ली गावाकडे जातो. हाच रस्ता पुढे नेवाळी, खोणी गाव हद्दीत जातो. त्यामुळे या रस्त्यावरून नियमित वाहतूक असते. शिळफाटा रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक उंबार्ली रस्त्याचा वापर करतात.
हेही वाचा : ठाणे : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात चोरी
सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता अरूंद आणि अनेक वर्ष दुरूस्त न केल्याने पालिका हद्दीत असलेल्या या रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम ‘एमएमआरडीए’तर्फे सुरू आहे. या रस्त्याच्या पुढच्या टप्प्याचे काम करण्यासाठी ई प्रभागाचे साहाय्य्क आयुक्त भारत पवार शुक्रवारी या रस्ते मार्गातील अतिक्रमणे काढणे, रुंदीकरण कामासाठी जेसीबी पथक घेऊन गेले होते. जेसीबीने खोदकाम सुरू असताना अचानक आरोपी चंद्रमा ठाकूर ही महिला खोदकाम करण्यात येत असलेली जमीन आपल्या मालकीची आहे. याठिकाणी काम करायचे नाही, असे बोलून साहाय्यक आयुक्त पवार यांना शिवागीळ करू लागली.
हेही वाचा : विहीरीत मृतदेह आढळल्याने खळबळ
या महिलेने दांडके आणून पवार यांना ती मारहाण करण्यास धावली. महिला पोलिसांनी तिला रोखले. एका महिला पोलिसाला चंद्रमाने जोरात ढकलल्याने ती जमिनीवर पडल्याने तिला दुखापत झाली. साहाय्यक आयुक्त पवार यांनी या महिलेला न जुमानता रूंदीकरणाचे काम सुरू ठेवण्यास सांगितले. आक्रमक होऊन महिलेने जेसीबीखाली येऊन स्वताहून काम थांबिवले. सात ते आठ पोलिसांना उद्देशून ही महिला आक्रमक भाषा करत होती. या महिलेमुळे काम थांबल्याने आणि तिने अर्वाच्च भाषेत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार साहाय्यक आयुक्त पवार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी रखडलेले सर्व रस्ते कामे मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. “उंबार्ली रस्त्याचे रूंदीकरण करताना एका महिलेने कामात अडथळा आणला. या रस्ते कामात अडथळे आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता मार्गी लागणे आवश्यक आहे.” – भारत पवार, सहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.