ठाणे : दिवा येथील ५४ बेकायदा बांधकामावर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्याने ठाणे महापालिकेचे पथक येथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेले होते. या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केले. दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदाहचे फलक उभारण्यात आले आहेत. तसेच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे.

दिवा परिसरातील ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक निघाले होते. कारवाईसाठी महापालिकेचे पथक येणार असल्याची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी आक्रमक झाले. इमारतींवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवासी देत आहेत. महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवला आहे. आमच्या मुलांच्या परिक्षा सुरू आहेत असे असा असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. महापालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका पथक येथे जेसीबी, हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडविला. दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागलेला आहे.

प्रकरण काय आहे?

दिवा परिसरात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यात २०१७ ते २०२१ या काळात उभारण्यात आलेल्या ५४ बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले. यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबविण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळविला असून उर्वरित ५२ इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता कारवाई होणार असल्याने रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केले जात आहे.

Story img Loader